X: @therajkaran
मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे होमपिच असलेल्या नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) याच पक्षाचे माजी विधानपरिषद सदस्य अमरिश पटेल (Amrish Patel) यांच्या संस्थेला सुमारे 600 कोटी रुपये बाजारमुल्य असलेली जमीन अवघ्या 1 रुपया प्रती चौरस फुट या दराने भाडे कराराने दिली आहे. या विरोधात कॉँग्रेसने आवाज उठवला असून या व्यवहाराची आणि नागपूर महापालिकेचे प्रशासक यांची चौकशी व्हावी, अशी मागणी कॉंग्रेस आमदार आणि लोकसभेचे उमेदवार विकास ठाकरे यांनी केली आहे.
लोकनियुक्त नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर नागपूर महापालिकेवर गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय (Administrator) राजवट आहे. याच प्रशासकीय काळात अमरिश पटेल अध्यक्ष असलेल्या केळवणी शैक्षणिक मंडल, विले पार्ले, मुंबई या संस्थेला वाठोडा येथील 18.35 हेक्टर (1975177.6 चौरस फुट) जमीन वार्षिक 1 रुपये प्रती चौरस फुट या दराने भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विकास ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही जमीन नागपूर महापालिकेने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी (Solid Waste Management project) नागरिकांकडून संपादित केली होती. पालिकेच्या प्रकल्पासाठी असलेला हा भूखंड पटेल यांना देताना प्रशासकांनी कोणाची परवानगी घेतली होती, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे यांच्या दाव्यानुसार या भूखंडाचे बाजारभावने 600 कोटी रुपये इतके मूल्यांकन आहे.
नागपुर महापालिकेने यापूर्वी याच मौजे वाठोडा शिवारात सिंबायोसिस विद्यापीठाला नाममात्र दरात भाड्याने भूखंड दिलेला आहे. या विद्यापीठात नागपूर आणि विदर्भातील विद्यार्थ्याना अल्प शैक्षणिक शुल्क भरून दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र हे विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये शुल्क आकारात आहे, असा दावा करून विकास ठाकरे म्हणाले, खरे तर महापालिकेने या विद्यापीठाला दिलेली जागा काढून घ्यायला हवी होती, तसे न करता, आणखी एक भूखंड भाजपच्याच नेत्याला अत्यल्प दरात उपलब्ध करून दिला आहे. हा नागपूरकर करदात्यांच्या पैशावर घातलेला दरोडा असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.