घाटकोपर व भायखळ्यात उत्स्फूर्त स्वागताची तयारी
By Mahadu Pawar
मुंबई : परभणीतील संविधानाच्या अवमानाविरोधात आंदोलनादरम्यान पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा या मागणीसाठी निघालेला परभणी-मुंबई लॉंग मार्च १६ फेब्रुवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध आंबेडकरी संघटनांनी मुंबई कृती समिती स्थापन केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
१६ फेब्रुवारी रोजी नाशिक मार्गे ठाण्यातून मुंबईत येणारा लॉंग मार्च घाटकोपरच्या माता रमाबाई आंबेडकर नगरात मुक्कामी थांबेल. १७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाच्या दिशेने मार्गस्थ होताना भायखळ्यातील राणी बाग येथे त्याचा तळ असेल. या मार्चमध्ये हजारो भीमसैनिक आणि आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
कृती समितीची प्रमुख नावे: माजी आमदार राम पंडागळे, रिपब्लिकन नेते काकासाहेब खंबाळकर, युनायटेड रिपब्लिकन पक्ष अध्यक्ष तानसेन ननावरे, रिपब्लिकन आठवले गट मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपब्लिकन पक्ष (खोरीप) महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ निरभवणे आणि युवा नेते नितीन मोरे.
लॉंग मार्चच्या स्वागतासाठी घाटकोपर आणि भायखळ्यात मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरू असून, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.