फलटण : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आज सकाळी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणेच्या तीन वाहनांनी फलटणमधील त्यांच्या निवासस्थानी प्रवेश केला आणि चौकशीला सुरुवात केली.
ईडीच्या कारवाईची माहिती मिळताच फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण आणि समर्थक कार्यकर्ते नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यासमोर जमल्याचे पाहायला मिळाले. प्राथमिक माहितीनुसार, ही कारवाई दूध प्रक्रिया प्रकल्पांशी संबंधित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फलटणसह इंदापूर तालुक्यातही अशाच प्रकारच्या छाप्यांचे वृत्त असून, केंद्रीय तपास यंत्रणेसह अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकानेही तपासणी केल्याची माहिती आहे.
राजकीय आकसाने कारवाईचा आरोप?
रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या समर्थनात सक्रिय होते. सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख राजकीय घराणी शरद पवारांच्या गटाकडे वळवण्यात त्यांनी भूमिका बजावली होती. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तटस्थ राहून पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता.
दरम्यान, भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माढा लोकसभा निवडणुकीत पराभवामध्ये फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा होती. त्यामुळे या कारवाईमागे राजकीय सूडभावना असल्याचा आरोप समर्थकांकडून केला जात आहे.
दूध प्रकल्प तपासाच्या केंद्रस्थानी?
ईडीसह विविध तपास यंत्रणांनी खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पांवर छापे टाकले असून, फलटण आणि इंदापूर परिसरातील काही ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अधिकृतरीत्या तपासाचे कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात हा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.