हैद्राबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हा दलितांच्या राजकीय चळवळीचे मातृस्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
हैद्राबाद येथील फायनान्स सिटी येथे आरपीआय ख्रिश्चन मायनॉरिटी आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आठवले यांनी स्पष्ट केले की, आरपीआय हा आमचा मातृपक्ष असून, शेवटच्या श्वासापर्यंत पक्ष बळकट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
या वेळी ख्रिश्चन आघाडीचे प्रमुख जॉन मसकु, परमशिवा नागेश्वरराव गौंड, ब्रम्हामानंद रेड्डी, तेलंगणाचे आरपीआय अध्यक्ष रवी पसुला आदी नेते उपस्थित होते. शहरभर लावण्यात आलेल्या निळ्या झेंड्यांमुळे संपूर्ण हैद्राबाद ‘रिपब्लिकनमय’ झाल्याचे समाधान आठवले यांनी व्यक्त केले.
संविधान सर्वोत्तम – आठवले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान असून, संसदीय लोकशाहीच्या बळकटीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे, असे आठवले यांनी सांगितले.
“रिपब्लिकन पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहोत”
रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार असून, सर्व जाती-धर्मांच्या लोकांना पक्षाच्या माध्यमातून जोडण्याचे काम सुरू आहे. एक दिवस रिपब्लिकन पक्षाची देशावर सत्ता येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.