बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री ही देश आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक करत देशात आणि विदेशात पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी व्यक्त केले. मराठा लाईट इन्फंट्रीच्या 256 व्या वर्धापन दिनानिमित्त बेळगाव येथे आयोजित मराठा दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार श्रीमती जोल्ले, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, पोस्ट विभागाच्या संचालक व्ही. तारा, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेलार यांनी सांगितले की, 4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरेंनी कोंढाणा किल्ला सर केला होता, आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस ‘मराठा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा महाराष्ट्र शासनानेही प्रथमच या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहभागाबद्दल ब्रिगेडियर मुखर्जी यांनी मंत्री आशिष शेलार यांचे आभार मानले. यावेळी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.