मुंबई: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असून, बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदपत्र तपासणीसाठी त्यांना जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावर जावे लागेल. यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, ही सेवा ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झाली असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.
कामगार नोंदणी, नूतनीकरण आणि लाभ वाटपासाठी एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाइन प्रणाली कार्यरत आहे. पूर्वी ही प्रक्रिया जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रांद्वारे होत होती. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्य शासनाने आता ३६६ तालुका सुविधा केंद्रे सुरू केली असून, प्रत्येक केंद्रावर दररोज १५० अर्जांची हाताळणी होईल.
८ नोव्हेंबर २०२४ पासून सुविधा केंद्रे कार्यरत आहेत आणि आतापर्यंत ५,१२,५८१ अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हाताळण्यात आले आहेत. काही केंद्रांवर कामगारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वेळ आणि रोजगाराच्या नुकसानीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नोंदणी प्रक्रियेत अधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी सुधारित सूचना जारी करण्यात आल्याचे फुंडकर यांनी सांगितले.
कामगारांना उशिराची तारीख मिळाल्यास जिल्हा सुविधा केंद्राऐवजी नजीकच्या तालुका केंद्रावर वेळेच्या आत अर्ज करता येईल. तसेच, जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्यांसाठी अतिरिक्त सुविधा केंद्र कार्यरत राहतील. सर्व प्रलंबित अर्ज ३१ मार्च २०२५ पूर्वी निकाली काढण्यासाठी मंडळ स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे.