नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नेमलेल्या बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटी दूर करून पूर्ववत आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
भुजबळ यांनी पत्राद्वारे नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल तिहेरी चाचणीच्या आधारावर मान्य केला असला तरी राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रत्यक्षात ओबीसींची लोकसंख्या ५४ टक्के असताना आयोगाने ३७ टक्के लोकसंख्या असल्याचा निष्कर्ष काढला आहे, ज्यामुळे ३३,८३४ ओबीसी जागा कमी झाल्या आहेत.
त्यांनी सूचवले आहे की, ज्या भागांत ओबीसींची लोकसंख्या कमी दाखवली गेली आहे तेथे फेरसर्वेक्षण करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्क्यांच्या मर्यादेत राहून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी आरक्षण लागू करावे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मयाचे वितरण करा – छगन भुजबळ
छगन भुजबळ यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र वाड्मयाच्या प्रती छापून वितरणासाठी उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, या साहित्यामुळे फुले दाम्पत्याचे समाजसुधारणेसाठी दिलेले योगदान जनसामान्यांपर्यंत पोहोचेल. सध्या या पुस्तकांच्या प्रती उपलब्ध नसल्याने सरकारने त्यांची छपाई करून वितरण करावे.