नवी दिल्ली: मुंबईतील विविध पायाभूत प्रकल्प निधीअभावी रखडले असून, त्यांची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला ₹1 लाख कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत नियम ३७७ अन्वये केली.
मुंबईच्या विकासासाठी निधी आवश्यक
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून लोकसंख्या वाढीमुळे वाहतूक, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.
प्रकल्पांसाठी निधीचा विनियोग
या निधीतून पुढील महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील:
• गारगाई-पिंजाळ व दमणगंगा पाणी योजना – मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी.
• मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण आणि मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी – वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी.
• कॅन्सर केअर हॉस्पिटल – मुंबईत कॅन्सर उपचारासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यासाठी.
• वेस्ट टू एनर्जी प्लांट – कचरा व्यवस्थापन व वीज निर्मिती वाढवण्यासाठी.
• सिमेंट-कॉंक्रीट रस्ते आणि आरोग्य सेवा सक्षमीकरण – नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी.
मुंबईच्या विकासाला राष्ट्रीय प्राधान्य हवे – खासदार वायकर
मुंबईच्या समस्यांवर त्वरित तोडगा काढल्यास देशाच्या आर्थिक प्रगतीला गती मिळेल, असेही वायकर यांनी लोकसभेत स्पष्ट केले. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हा निधी आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.