मराठवाड्यातून नवीन रेल्वेसेवांची संसदेत मागणी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून राज्याच्या राजधानीसाठी थेट विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज राज्यसभेत केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना त्यांनी मोदी सरकारच्या दळणवळण क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. हवाई, रेल्वे आणि रस्ते क्षेत्रात मोठी सुधारणा झाली असली तरी मराठवाड्यासारख्या भागांना अधिक प्राधान्य द्यावे, असे त्यांनी नमूद केले.
मुंबईसाठी थेट विमानसेवा अनिवार्य
उडान योजनेमुळे महाराष्ट्रातील अनेक शहरे हवाई मार्गाने जोडली गेली, मात्र अनेक शहरांमधून मुंबईसाठी थेट विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही, असे चव्हाण म्हणाले. नवी मुंबई विमानतळ सुरू होत असल्याने मुंबई विमानतळावरील ताण कमी होईल. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना मुंबईशी थेट जोडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मराठवाड्यासाठी अमृत भारत व वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी
मराठवाडा विभागातील प्रवाशांची सोय करण्यासाठी अमृत भारत एक्सप्रेस व वंदे भारत एक्सप्रेसच्या नव्या सेवा सुरू कराव्यात, असेही त्यांनी सुचवले.
पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक
गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग आला आहे. २०१४ पूर्वी वार्षिक फक्त २ लाख कोटी रुपये खर्च होत होते, आता हा निधी ११ लाख कोटींवर गेला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान आवास योजनेत ३ कोटी घरे
पंतप्रधान आवास योजनेत ५.३६ लाख कोटी रुपये खर्च करून ३ कोटी घरे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०१७ च्या सर्वेक्षणाऐवजी नवे सर्वेक्षण केल्यास अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे त्यांनी सुचवले.
स्वामित्व योजना आणि वनहक्क पट्ट्यांचा मुद्दा
ग्रामीण भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा ‘स्वामित्व’ योजनेतील निर्णय योग्य असल्याचे सांगत वनक्षेत्रात पिढ्यान्पिढ्या कसलेल्या जमिनींचे पट्टे शेतकऱ्यांच्या नावावर करावेत, अशीही मागणी चव्हाण यांनी संसदेत केली.