सर्वसामान्य जनतेला मंत्रालयात प्रवेश मिळावा, सरकारला जनतेची भीती का वाटते?
मुंबई – मंत्रालयात प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली चेहरा पडताळणी (Face Recognition) व्यवस्था त्वरित बंद करावी, कारण यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रवेश नाकारला जात आहे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तालुका आणि जिल्हा पातळीवर प्रश्न सुटले नाहीतर सामान्य जनता थेट मंत्रालयात येऊन मंत्री, सचिव यांना भेटून आपली व्यथा मांडते. मात्र, महायुती सरकारला जनतेची भीती वाटते का? मंत्र्यांचे जवळचे कंत्राटदार आणि दलाल यांना सहज प्रवेश मिळतो, पण शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र प्रवेश रोखला जातो, हे अन्यायकारक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई का नाही?
मुंबईत पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले असून, सत्ताधारी आमदारच त्यांच्याविरोधात आवाज उठवत आहेत. तरीही सरकार कोणतीही चौकशी करत नाही. “सत्ताधाऱ्यांना कितीही आरोप झाले तरी काही फरक पडत नाही, अशी बेशरमीची भूमिका सरकारने घेतली आहे,” अशी जोरदार टीका वडेट्टीवार यांनी केली.
याच संदर्भात संतोष देशमुख प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. “महाराष्ट्र पोलिस इतके कमजोर झाले आहेत का, की एक फोन शोधता येत नाही? तो सापडला तर सत्य बाहेर येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना थकलेले पैसे, ओबीसी विद्यार्थ्यांना भत्ते नाहीत
वडेट्टीवार यांनी सरकारच्या आर्थिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
• धान आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.
• ठिबक सिंचनासाठी अनुदान थकले आहे.
• मनरेगाच्या मजुरांचे गेल्या सहा महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे गडचिरोलीत एका कामगाराने आत्महत्या केली.
• ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि भत्ते दिले गेले नाहीत. त्यांना सावत्र वागणूक मिळत आहे.
“राज्य सरकार कंगाल झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यावर अन्याय केला जात आहे,” असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठीच मंत्र्यांमध्ये मतभेद आणि वाद निर्माण करत आहे, असा गंभीर दावा करत “ही सरकारची दिशाभूल करणारी खेळी आहे,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले.