Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly election 2023) पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यानेच हताश आणि निराश झालेल्या मोदी सरकारने राजकीय सुडबुद्धीने नॅशनल हेराल्डवर (National Herald) ईडीची कारवाई केली, असा थेट आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. पण काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या या दडपशाहीला भीक घालत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेराल्ड’ मधील कथित मनी लॉंडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या वृत्तपत्राची मालकी असणाऱ्या यंग इंडियन कंपनीच्या ७५१.९ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या पार्श्वभूमीवर पटोले यांनी केंद्र सरकारवर खरमरीत टीका केली. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सर्व कागदपत्रे सार्वजनिक आहेत. यापूर्वीही ती जाहीर केलेली आहेत. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सातत्याने नॅशनल हेराल्डवर कारवाई करत आहे. पण अद्याप त्यांच्या हाती काहीच लागले नाही. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पराभव दिसू लागताच मोदी सरकार ईडीचा (Enforcement Directorate) दुरुपयोग करून अशा प्रकारच्या कारवाया करून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असते, असा आरोपही पटोले यांनी केला.
यापूर्वीही याच प्रकरणात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चौकशीच्या नावाखाली बोलावून दहा-दहा तास बसवून नाहक त्रास देण्यास आला होता. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. नॅशनल हेराल्ड चालवणारी असोसिएटेड जर्नल या कंपनीकडून गांधी कुटुंबातील कोणाला किंवा कंपनीच्या कोणत्याही संचालकांना पगार किंवा नफा मिळत नाही. त्यामुळे त्यात काही घोटाळा झाला हा भाजपचा (BJP) आरोप खोटा आहे. आता पाच राज्यातील दारूण पराभव समोर दिसत असल्याने भाजपने पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ठराविक वेळेत घ्यायला हवी होती. महाराष्ट्र विधिमंडळाचे (Maharashtra State Legislature) नाव देशात घेतले जाते. पण भाजपने घाणेरडे राजकारण करत या लौकिकाला कलंक लावला. विधानसभा अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) ताशेरे ओढावे लागणे ही कलंक लावणारी बाब असून विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचे पावित्र राखले पाहिजे. पण आज जे चालले आहे ते बरोबर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr Babasaheb Ambedkar) संविधानाने मी आज आमदार आहे, असे शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी सुनावणीवेळी म्हटले तर तो नामोल्लेख सुद्धा कामकाजात येऊ द्यायचा नाही. अशा राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा खराब होत असेल तर आयुधांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि आम्ही या प्रश्नी अधिवेशनात प्रश्न विचारु, असेही पटोले ठामपणे सांगितले.