मुंबई
शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महालक्ष्मी येथील रेस कोर्स आणि सरकारच्या दावोस दौऱ्यावर निशाणा साधला आणि गेल्या दोन वर्षांतील उद्योगांबद्दल मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माझ्यासोबत वादविवाद करावा, असं चॅलेंज आदित्य यांनी यावेळी दिलं. सरकारच्या दावोस दौऱ्यावरून सवाल देखील उपस्थित केले आहे. ‘जनता न्यायलयानंतर लगेच सूरज चव्हाण यांना अटक झाली. राजन साळवींना त्रास दिला जातोय. राजन साळवींनी लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी काही चूक केली नाही आणि केली असती तर तुमच्या सोबत ते आले असते’. असं म्हणत सरकारच्या क्रूर वागण्यावर आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवलं…
मुंबईकरांचे पैसे तबेल्यांवर वापरणार का?
रेस कोर्स संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ‘रेस कोर्स मध्ये मध्ये ओपन हाऊस घेतलं. पण त्यात प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. थीम पार्क आमचा देखील मुद्दा होता पण कोणतही कन्स्ट्रक्शन न करता. पण आता हा प्रकल्प राबवून मुंबईकरांचे पैसे तबेल्यांवर वापरणार आहात का ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी सरकारला केला. तसंच एफएसआय बाजूच्या गृहनिर्माण प्रकल्पाला देण्याची गरज काय आहे ? अंडरग्राउंड पार्कींग देखील आम्ही होऊ देणार नाही असा इशारा देतानाच RWRTC ने त्यांचा दंड भरावा आणि पुन्हा मैदान लिजवर घ्यावं असं आवाहन आदित्य यांनी केलं आहे .
राज्याच्या वतीने खासदाराला दावोसला जाण्याची परवानगी आहे का ?
राज्य सरकारच शिष्टमंडळ दावोस दौऱ्यावर गेलं. या दौऱ्या संदर्भात बोलताना ‘परदेश दौऱ्यांवर खूप खर्च झाला आहे. गेल्या वर्षी ४० खोक्यांचा खर्च झाला होता. मात्र गेल्यावर्षीच्या अनेक प्रकल्पांचं पुढे काही झाल नाही, अशी माझी माहिती आहे. काही झालचं असेल तर उद्योग मंत्र्यांनी पुढे येऊन पुरावे द्यावे. तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्री दीड दिवस दावोसला गेले होते. ४० लोक घेऊन गेले होते. पण तेव्हा एमआयडीसीला २० कोटी खर्च दाखवण्याचं बंधन होत. पण तिथे काय केल ? तर ज्या उद्योगपतींना इथं भेटणं अपेक्षित होते ते त्याना तिथे भेटले. त्यामुळे प्रत्यक्षात काम शून्य झालं. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरममध्ये मला तीन वेळा बोलायला मिळालं होतं. तिथल्या काँग्रेसमध्ये महाराष्ट्राबद्दल सांगणं भूमिका मांडणं अपेक्षित असतं. मात्र तिथं बोलल्याचा मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो नाही. कदाचित काँग्रेस असल्यामुळे भाजपची परवानगी घेणं अपेक्षित असल्याचं त्यांना वाटलं असेल. आता ज्यांच्यासोबत एमओयू झाले आहेत त्यांच्या सोबत आमची पण चर्चा झाली होती, पण त्यांनी हे एमओयू थांबवून ठेवले होते, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या मागील दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केले .
मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं. सुट्टी घालवायची होती. म्हणून ते दावोसला गेले असावेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्हायब्रंट गुजरातमध्ये २६ लाख कोटीची गुंतवणूक झाली. तामिळनाडूत देखील स्वत:च्या राज्यात अशी समिट आयोजित केली. जिथं त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. पण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात असं कोणतंही समिट झालं नाही. त्यातही दावोसला गेलेल्या शिष्टमंडळलाला एमईएसची परवानगी होती का, हे देखील स्पष्ट नाहीये. ती मंडळी स्व खर्चाने गेल्याचा दावा करतायत त्यांची नावे सादर करावी. एमएमआरमधील अधिकारी आणि एका खासदाराने दावोस येथे संबोधन केले , हे कोण नातेवाईक आहेत का मुख्यमंत्र्यांचे ? आणि महत्वाचं म्हणजे खासदाराला राज्याच्या वतीने जाण्याची परवानगी आहे का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला होता.