मुंबई
महालक्ष्मी येथील रेसकोर्सची जागा बळकावण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला आहे. या जागेवर पुनर्विकासाच्या नावाखाली व्यावसायिक वापर करण्याचा प्रयत्न भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावरुन केला.
यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळची एक व्यक्ती विकासक रेसकोर्स व्यवस्थापनाला करार करण्यासाठी धमकी देत असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड रेसकोर्स व्यवस्थापनाला १९१४ मध्ये भाडेकरारावर देण्यात आला होता. हा भाडेकरार २०१३ मध्ये संपुष्टात आला. राज्य सरकारच्या मालकीच्या भूखंडाचे नुतनीकरण करण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे आहे, मात्र नुतनीकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे पालिकेकडून नुतनीकरण केलेले नाही. दुसरीकडे व्यवस्थापनाने अनेकदा भाडेकराराचे पैसे देण्याची तयारी दर्शवली आहे. परिणामी महालक्ष्मी रेसकोर्सच्या भाडकराराचे अद्याप नुतनीकरण न झाल्याने नवा वाद उद्भवला आहे.
आदित्य ठाकरेंच्या आरोपानुसार, रेसकोर्सच्या एकूण जमिनीपैकी काही जागा रेसकोर्ससाठी राखीव ठेवून उरलेल्या जागेच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे विकासक रेसकोर्सला धमकावत आहेत.