X: @therajkaran
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांचा विश्वासू सहकारी अजय बारस्कर यांनी काल पत्रकार परिषद घेत जरांगे पाटलांवर धक्कादायक आरोप केला. त्यानंतर आज पुन्हा जरांगेंच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांच्या आरोपानंतर मराठा आंदोलन धोक्यात सापडल्याची चिन्हं आहेत.
संगीता वानखडे या एकेकाळी मराठा आंदोलनात जरांगे पाटील यांच्या सहकारी होत्या. यावेळी त्यांनी जरांगेंवर घणाघाती हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, ‘मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केले. परंतु मला खरे समजल्यावर गेल्या १ ते १.५ महिन्यांपासून मी विरोध करत आहेत. मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवले आहे.’
यापूर्वी अजय महाराजांनी पत्रकार परिषद घेत जरांगेंच्या हेतूवर संशय व्यक्त केला होता. त्यांना कोणाचे तरी फोन येतात आणि जरांगे निर्णय घेतात असा त्यांचा आरोप आहे. तर आज वानखेडे यांनी केलेल्या आरोपात जरांगेंना शरद पवारांचा फोन येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचं भवितव्य धोक्यात असल्याचं चित्र आहे.
जरांगे पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून हा सरकारचा ट्रॅप असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान 3 मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठा रास्ता रोको होणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी असलेले विवाहसोहळे संध्याकाळी ढकलण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजासह इतर सर्व समाज बांधवाना केले आहे.