मुंबई : राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात केवळ मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या या भाषणानंतर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यांच्या या भूमिकेचं भाजप आणि महायुतीतील इतर घटक पक्षांकडून स्वागत केलं जात असताना महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र यावर टीका केली जात आहे. २०१४ मध्ये राज ठाकरेंनी मोदींविरोधात टोकाची टीका केलेले व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.
दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या कालच्या भाषणात मी कधीच कोणताही पक्ष फोडणार नाही, व्यभिचाराला पाठिंबा नसल्याचं म्हटलं होतं. यावरुन जितेंद्र आव्हाडांनी सवाल उपस्थित केले आहेत. मोदींना ‘राज’मान्यता पण, “व्याभिचाराला” नाही, राज ठाकरे यांच्या या वाक्याचा अर्थबोध झाला नाही; कार्यकर्त्यांनाही हे समजलेले नाही. मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही, असे म्हणणे म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही, असा तर अर्थ नाही ना? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
काल राज ठाकरेंना केवळ भाजपला पाठिंबा द्यायचा आहे का? पक्ष फोडणं त्यांना पटत नसेल तर पक्ष फोडणाऱ्यांसोबत असलेल्या महायुतीला त्यांनी पाठिंबा देण्याचं समर्थन करता येईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. याचाचा परिणाम आज मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला.
रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक आहे’, असं लिहिलेलं असतानाही तंबाखू खाण्याची अर्थातच ‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय? हे सांगता येणार नाही, पण राज्यातील एका स्वायत्त आवाजाने आपली स्वायत्तता गमावली, हे बघून मराठी मनं नक्कीच दुखावली असतील.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या भाषणानंतर ट्विट केलं, यात त्यांनी आम्हाला हुजरेगिरी मान्य नाही! आमच्या मातीचा, महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला प्राणपणाने जपायचाय! हा स्वाभिमान जपण्यासाठी, सदैव धगधगत राहणार ठाकरेंची मशाल, असं म्हटलं आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. मन माझं त्यात , मी नाही खात काय नाही त्यात? तर गूळ नाही त्यात.. असं म्हणत अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं.