नवी दिल्ली : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे समर्थन करून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपण्याची आणि हिंदुत्व सोडण्याची चूक सुधारण्याची संधी उबाठाकडे होती. मात्र, त्यांनी विधेयकाला विरोध करून बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केली, असा जोरदार आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. “उबाठाला आधी हिंदुत्वाची अॅलर्जी होती, आता हिंदूंचीही अॅलर्जी झाली,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला पाठिंबा देताना खासदार डॉ. शिंदे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.
खासदार डॉ. शिंदे म्हणाले, “उबाठा खासदार अरविंद सावंत यांचे भाषण ऐकताना मला प्रचंड वेदना झाल्या. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर त्यांनी असे भाषण केले असते का, हा प्रश्न उबाठाच्या खासदारांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारायला हवा. विधेयकाला विरोध करून ते नेमके कोणाच्या विचारांवर चालत आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे.”
“बाळासाहेबांचे विचार हिंदुत्व, देशाची एकता आणि सर्व धर्मांचा सन्मान याभोवती केंद्रित होते. मात्र, आज उबाठाने घेतलेली भूमिका बघितली, तर त्यांना बाळासाहेब ऐकूनही असह्य झाले असते,” असेही ते म्हणाले.
“उबाठाने वक्फ बोर्डावर बिगर-मुस्लिम सदस्यांच्या मुद्याला विरोध केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना आधीच अॅलर्जी होती, आता हिंदूंच्या हक्कांवरही त्यांना अॅलर्जी होऊ लागली आहे,” अशी घणाघाती टीका खासदार शिंदे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “मुस्लिम शासकांच्या मालमत्तांचे संरक्षण करावे म्हणून उबाठाने पत्रे पाठवली आहेत. म्हणजेच ते औरंगजेबाच्या विचारांवर चालत आहेत! ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून ठार मारले, त्या औरंगजेबाच्या विचारांची भलामण करण्याची नामुष्की उबाठावर ओढवली आहे.”
“बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. कलम ३७० हटवण्याची मागणी केली होती. मात्र, त्याच राममंदिरावर आज उबाठाचे खासदार प्रश्न विचारत आहेत.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला. उबाठाचे खासदार त्यावर जाब विचारणार का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे नाव ‘उम्मीद’ ठेवण्यात आले आहे. हे विधेयक मुस्लिम समाजातील गरीब घटकांच्या कल्याणासाठी आहे. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
ते पुढे म्हणाले, “शाहबानो प्रकरणात कोर्टाने न्याय दिला होता, मात्र काँग्रेस सरकारने तो न्याय नाकारला. कलम ३७० हटवताना काँग्रेसने बघ्याची भूमिका घेतली. २००६ मध्ये सच्चर आयोगाचा अहवाल सादर झाल्यावर ८ वर्षं तो काँग्रेस सरकारने केराच्या टोपलीत टाकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने ३७० कलम हटवले, तिहेरी तलाकवर बंदी घातली, आणि आज ऐतिहासिक वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आणले. हे मतांसाठी नाही, तर देशाच्या हितासाठी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०११ मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारने १,००० कोटींच्या वक्फ घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस सरकारकडे केली होती. २०१९ मध्ये काँग्रेसने दिल्लीतील आम आदमी पार्टी सरकारविरोधात तक्रार केली होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री असताना आजम खान यांनी वक्फच्या नावाखाली जमिनी लुटल्या. आज त्यांच्यावर ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि ते तुरुंगात आहेत.”
“तेलंगणात ७७,००० एकर वक्फ जमिनींपैकी ५५,००० एकर जमिनींबाबत खटले सुरू आहेत. केरळातही अशीच परिस्थिती आहे. वक्फच्या नावाखाली केलेली पापं आता उघडकीस येणार आहेत, म्हणून विरोधक घाबरले आहेत,” असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.