बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. आतापर्यंत नणंद विरूद्ध भावजय यांच्यामध्ये संघर्ष सुरू असताना आता हीच लढाई भाऊ विरूद्ध बहीण अशी होण्याची शक्यता वाढली आहे. अजित पवार बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची चर्चा आहे.
बारामतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. मात्र याच वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावेदेखील अर्ज घेण्यात आला आहे. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार हे डमी उमेदवार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात आहे.
सर्वसामान्यपणे प्रतिष्ठेची लढाई असलेल्या मतदारसंघात राजकीय पक्षाकडून डमी उमेदवार उतरवला जातो. काही कारणास्तव मुख्य उमेदवाराचा अर्ज पडताळणीदरम्यान बाद झाला तर त्या जागेवरुन उमेदवारच नसल्याची नामुष्की ओढवू नये यासाठी तोलामोलाच्या उमेदवाराचा अर्ज भरला जातो.