Twitter : @NalavadeAnant
मुंबई
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सत्तेतील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा विश्वास नसल्याचे दिसून येत असून पवार यांच्याविषयी प्रश्न विचारल्यानंतर रामदास कदम म्हणाले, अजितदादा काय करतात ते समजत नाही. एकाचवेळी उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते शरद पवार यांना भेटले तर समजू शकतो. काय चाललं ते समजत नाही. कधी कधी अजितदादांना डेग्यू होतो. त्यांचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करतात. मला हे काही समजत नाही. जेव्हा मराठा समाज अंगावर आला, तेव्हा डेंग्यू झाला तरी दादा काही करू शकतात. दादा दादा आहेत, असा खोचक टोला रामदास कदम यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार उर्फ दादांकडून केल्या जाणाऱ्या राजकारणावर त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना देखील त्यांच्या राजकारणाचा थांगपत्ता लागत नसतो. त्यामुळेच की काय सत्तेत सोबत असलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी देखील अजितदादांच्या राजकारणावर भरोसा नसल्याचे दर्शवले आहे. सरकार अडचणीत येते नेमके त्याचवेळी डेंग्यू होतो आणि ते स्वतःला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अलिप्त ठेवतात तर दुसरीकडे पवार गटाचे आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मंत्रालयात आंदोलने करतात. हा मोठा विरोधाभास त्यांच्या कृतीतून दिसून येतो.
नाही तर रडायची वेळ येईल – सूरज चव्हाण
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्या टीकेला अजित पवार गटाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. अजित पवारांवर बोलावे, आपण इतके मोठे नेते नाही. पवार आपल्या आकलनाबाहेरचे नेते असल्याचं लक्षात ठेवा, असा इशारा पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिला आहे.
पवार एकत्रित भेटण्याच्या प्रश्नावर सूरज चव्हाण म्हणाले, पवार कुटुंबाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक जपण्याचं काम केलं आहे. सुखदुःखात सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र येणं ही आपली संस्कृती आहे. त्याला राजकीय रंग देण्याचं काम आपल्यासारखा ज्येष्ठ नेत्याकडून होत आहे हे दुर्दैव आहे, असे त्यांनी नमूद केले. पवार कुटुंब आणि अजित पवार आपल्या अकलना बाहेरचा विषय आहे, आपलं जेवढं आकलन आहे तेवढेच वक्तव्य करावं नाहीतर डोळ्याला झंडू बाम लावून रडण्याची वेळ येते, असा सल्ला देखील चव्हाण यांनी कदम यांना दिला.