नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत (CAA) मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण देशात CAA लागू करण्यात येईल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. अमित शाह म्हणाले की, CAA मुळे कोणत्याही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर मुस्लिमांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.
ते पुढे म्हणाले, CAA लागू करण्याची अधिसूचना निवडणुकीपूर्वी जारी केली जाईल. डिसेंबरमध्ये बंगालच्या भेटीदरम्यान शाह यांनी दावा केला होता की सीएएची अंमलबजावणी कोणीही रोखू शकत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी एका वृत्त समुहाच्या कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं की, आम्ही कलम 370 रद्द केले, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की देशातील जनता भाजपला 370 जागा आणि एनडीएला 400 हून अधिक जागांवर विजय निश्चित करून आशीर्वाद देतील.
राजकारणामुळे, कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण सांगत इतकी वर्षे राम मंदिर बांधू दिलं नाही, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन होईल, असा दावा शाह यांनी शनिवारी केला.