नवी दिल्ली : आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असं पिता उद्धव ठाकरे यांना वाटतं; अशा शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यापुढे ते म्हणाले, घराणेशाही असलेले पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत.
घराणेशाही असलेले पक्ष सत्तेच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत, असा घणाघातही अमित शाह यांनी केला. तर भाजप प्रवेशानंतर कोणत्याही राजकीय नेत्यावरील केसेस मागे घेतलेल्या नाहीत, असा दावाही शहांनी केला, एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
इंडिया ही आघाडी वगैरे काही नाही. ही आघाडी म्हणजे काही सत्तालोलुप पक्षांचं एकत्र येणं आहे. या लोकांना आपल्या मुलांना, पुतण्याला, भाच्याला मुख्यमंत्री किंवा मंत्री किंवा पंतप्रधान बनवायचं आहे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत हे सोनिया गांधी यांचं लक्ष्य आहे. तर उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. स्टॅलिन यांनाही त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं आहे. ममता बॅनर्जी यांना त्यांच्या भाचीला सत्तेत आणायचं आहे. यात आघाडी कुठे आहे? या लोकांना आपल्या कुटुंबाचं कल्याण करायचं आहे, असं म्हणत अमित शहांनी धक्कादायक आरोप केले.
भाजपात कोणीही आलं तरी त्यांच्यावरील केसेस मागे घेतलेल्या नाहीत. पाच टक्क्यांहून अधिक राजकीय नेत्यांच्या संपत्ती जप्त झाल्या आहेत. तर ९५ टक्के जप्ती ही काळ्या पैसे धारकांवरील आहे, ईडीने लाखो कोट्यवधी रुपये जप्त करणं, हे काळ्या पैशाविरोधातील, भ्रष्टाचाराविरोधातील अभियान आहे, असंही अमित शहा यांनी सांगितलं.