मुंबई : देशातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता या लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहू लागले आहेत .अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray )यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय प्रवासाला सुरुवात करत असल्याची चर्चा रंगली आहे. अमित ठाकरे यांच्या वाढदिवसादिनी मुंबईतील शिवाजी पार्क, वरळीसह अनेक भागात ठाकरेंचे होर्डींग्ज लावण्यात आले होते . त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या मनसैनिकांनीही त्यांच्या विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता , यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दुसरे ठाकरे थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी, राज ठाकरेंसमवेत अमित ठाकरेही भेटीसाठी हजर होते. या भेटीनंतर त्यांनी ग्रेटभेट असं कॅप्शन लिहून फोटोही शेअर केले होते. त्यामुळे, अमित ठाकरे आता संसदीय राजकारणात सक्रीय होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच, वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही काही सूचक संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ते आता लवकरच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे .
ठाकरेंच्या वाढदिवसांनी मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला.कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोषात वाढदिवस साजरा केला . विधान भवन, मंत्रालय आणि लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकर मंत्रालयात जावे, या शुभेच्छा देणारा होता. अमित ठाकरे यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून त्यांनी राजकीय करिअरची सुरुवात केली. मुंबईसह पुण्यात विद्यार्थ्यांच्या विषयांना धरुन त्यांनी आंदोलने केली आहेत. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे . .