मुंबई
अमोल कोल्हे यांच्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांची खदखद समोर आली. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उल्लेख करीत आपली भूमिका मांडली. सविस्तर मुलाखत ५ जानेवारी रोजी सर्वांना पाहता येणार आहे, मात्र त्यापूर्वी त्यातील काही अंश त्यांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केला आहे.
अजित दादांचं बंड जिव्हारी
अजित दादांनी राष्ट्रवादीशी केलेला बंड आव्हाडांच्या जिव्हारी लागला. या मुलाखतीत ते म्हणाले की, बाहेरच्यांनी केलेला द्रोह निपटून टाकता येतो पण घरच्या द्रोहाचं काय? याचा सर्वाधिक त्रास शरद पवारांना झाला. दिल्लीला साहेब जेव्हा एकटे बसत असतील तेव्हा त्यांना काय वाटत असेल… मी कुठे चुकलो… मी काय कमी केलं… हे विचार त्यांना सतावत नसतील का? पाण्यात पोहणारा मासा रडताना दिसत नाही. साहेब कधी बोलून दाखवत नाही, परंतू त्यांना दु:ख होत नसेल असं नाही. ज्यांनी साहेबांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी वाटाघाटी होऊच शकत नाही.
ते पुढे म्हणाले की, जर तुम्हाला वाटत असेल की उभा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे, तर स्वतंत्र निशाणी आणि पक्ष घेऊन निवडणूक लढवा. ज्या घराने तुम्हाला मान-सन्मान, ऐश्वर्य दिलं ते घर पाडताना कसं काही वाटलं नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा बाळगायच्या. यावेळी त्यांनी भुजबळांवरही टोला लगावला. भुजबळ बोलत नाही कारण ते पोपट झालेत.