मुंबई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी अत्यावश्यक आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी सुनिश्चित करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने समन्वय साधून वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी. तसेच, शाळांना पूर्वसूचना देऊन पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आरोग्य तपासणीपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी राज्यस्तरावर ॲप विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे अतिरिक्त संचालक डॉ. कमलापूरकर, उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
श्री. भुसे म्हणाले, आरोग्य तपासणीपूर्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेमार्फत सूचना दिल्या जाव्यात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवेळी पालक उपस्थित राहतील, यासाठी दिनदर्शिका तयार करण्यात यावी. तपासणीच्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची जबाबदारी शिक्षण विभागाने घ्यावी.
विद्यार्थ्यांच्या नियमित तपासणीव्यतिरिक्त, आजारी पडल्यास ‘आरबीएसके’ अंतर्गत त्याला तातडीने उपचार मिळावेत. तसेच, ज्यांना पुढील उपचाराची आवश्यकता असेल, त्यांना संपूर्ण वैद्यकीय मदत मिळेल, याची दक्षता घ्यावी. यासाठी नाशिक जिल्ह्यात व दमणमध्ये विकसित ॲपचा आरोग्य व शिक्षण विभागाने अभ्यास करावा. त्यातील उपयुक्त बाबींचा समावेश करून राज्यस्तरावर विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी ॲप तयार करावे, असे निर्देश श्री. भुसे यांनी दिले.
श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांसाठीच्या अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा जिल्हानिहाय आढावा घेण्याच्या सूचनाही दिल्या. प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासह या योजनेबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास शिक्षकांनी पुढाकार घेऊन त्याला व पालकांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी, विद्यार्थ्यांचे आरोग्य ही अत्यावश्यक बाब असल्याने ‘आरबीएसके’च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची तपासणी वेळेवर आणि प्रभावीपणे होईल, याची आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले.