मुंबई : पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तींच्या वापराबाबत स्पष्टता आणण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या तज्ज्ञ समितीकडून सर्वंकष अभ्यास केला जाणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी परेल येथील नरे पार्कमध्ये आयोजित मूर्तिकार संमेलनात ही माहिती दिली.
मूर्तिकारांच्या रोजगार आणि कला-संस्कृतीशी संबंधित या विषयाच्या महत्त्वामुळे, शासन मूर्तिकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आगामी 20 तारखेला शासन न्यायालयात भूमिका मांडणार असून, त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ वकील उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाही ॲड. शेलार यांनी दिली.
पीओपीच्या वापराबाबत संभ्रम दूर करण्यासाठी मंत्री ॲड. शेलार यांनी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाला तज्ज्ञ समिती गठीत करून सर्वंकष अभ्यास करण्याची विनंती केली होती. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी या विषयातील तज्ज्ञ समिती गठीत करून अहवाल देण्याचे शासनास कळवले आहे.
उत्सवांच्या परंपरा आणि मूर्तिकारांच्या रोजगाराच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा असल्याने, शासन त्यांच्यापाठीशी उभे राहील, असे आश्वासन ॲड. शेलार यांनी दिले.