मुंबई : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून वाहन चालवणाऱ्यांची पडताळणी करण्याचा विचार केला आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
काशिनाथ दाते यांनी ‘राज्यातील रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ’ याविषयी प्रश्न विचारला होता. उत्तर देताना सरनाईक म्हणाले की, गतवर्षी ३६,०८४ अपघात झाले, ज्यामध्ये १५,३३५ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण देशाच्या तुलनेत ९ टक्के आहे.
सरनाईक यांनी पुढे सांगितले की, राज्यातील ९ राष्ट्रीय महामार्ग आणि सुमारे २१,४०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांवर अपघात प्रवण क्षेत्रांवर एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली उभारण्याचे प्रस्तावित आहे. वाहन चालवण्याचा परवाना देताना ३८ ऑटोमेटिक टेस्ट घेतल्या जातात, ज्यामध्ये ७० टक्के परीक्षार्थी नापास होतात.
अपघात प्रवण ठिकाणांची पडताळणी वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि परिवहन विभागांकडून संयुक्तपणे करण्याचा विचार केला जात आहे. तसेच, अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना १० लाख रुपये देण्यात येतात, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली.
या चर्चेत योगेश सागर, आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, गोपीनाथ पडळकर या सदस्यांनी सहभाग घेतला.