गुहागर
ठाकरे गटाचे नेते अनंत गिते यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभेच्या उमेदवारीची उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली आहे. सुनील तटकरेंना गाडायचंय, सुनील तटकरे यांनी माझं घर फोडलं. त्यामुळे मला तटकरेंना गाडायचं आहे, असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, त्याचमुळे त्यांनी ठाकरेंकडे माझ्या नावाची शिफारस केली, असा खळबळजनक दावा गितेंनी केला आहे.
मीडियाशी बोलताना त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. गिते पुढे म्हणाले, एका माणसाच्या हट्टासाठी आमदार फुटले. मी पुन्हा येईन, पुन्हा येऊनसाठी नीच राजकारण केलं गेलं. याची शिकार ही एकट्या शिवसेनेची नाही. भाजपचे १०५ आमदार होते. ४० फोडले, तरीही त्यांची भूक भागत नाहीये. भाजपला भस्म्या रोग झाला आहे. त्यांना राज्यही हवंय आणि केंद्रही. आता भाजु घरे फोडायला निघाली आहे, असा हल्ला गिते यांनी चढवला.
यापूर्वीही अनंत गितेंचा शरद पवारांवर हल्ला
शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी यापूर्वीही (२०२१) शरद पवारांवर हल्ला चढवला आहे. ‘राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच’ असं अनंत गिते म्हणाले होते. यावेळी शिवसेनेने गितेंच्या वक्तव्यापासून फारकत घेतली होती. तर यावेळी सुनील तटकरेंनी “अडगळीत पडलेल्या नेत्यांना भान राहिलेलं नाही. त्याच नैराश्यापोटी आलेलं विधान आहे. एक व्यक्ती बोलल्याने पवार साहेबांचं स्थान कमी होणार नाही” असं म्हणत शरद पवारांचं समर्थन केलं होतं.