ताज्या बातम्या विश्लेषण

मुख्यमंत्र्यांचे आभार मानताच एकनाथ खडसे झाले ट्रोल

Twitter : @vivekbhavsar

मुंबई

मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदय विकारावर उपचार घेत असलेले पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकीय “वेळ” बिघडल्याने गेले दोन वर्षे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या “घड्याळा” सोबत राहून विधान परिषदेची आमदारकी पदरात पाडून घेतेलेले एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीबद्दल आभार मानले (Eknath Khadse thanked Chief Minister Eknath Shinde for his help). मात्र, एक्स वरील त्यांच्या या संदर्भातील पोस्टवर नेटकरी तुटून पडले असून आता तरी जळगावात सुसज्ज हॉस्पिटल उभारा, म्हणजे भविष्यात उपचारासाठी मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, असे सल्ले दिले आहेत.

एकनाथ खडसे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने प्रारंभी जळगावातील हॉस्पिटलमध्ये (Hospital in Jalgaon) दाखल करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एयर ॲम्बुलन्स उपलब्ध (Air Ambulance) करून देऊन खडसे यांना मुंबईत हलवले आणि बॉम्बे इस्पितळात (Bombay Hospital) दाखल केले. स्टेन्ट टाकल्यावर याच इस्पितळातील 1501 या विशेष रूम मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने एकनाथ खडसे यांनी एक्स वर एक पोस्ट टाकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

खडसे यांनी नमूद केले आहे कि, “मला त्रास झाल्यावर मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी एअर ॲम्बुलन्स उपलब्ध करुन दिली होती. त्यामुळे मला पुढील उपचारासाठी मुंबईला येणे सोयीचे झाले. याबद्दल आज मा. मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले.”

खडसे यांच्या या पोस्टवर नेटकरी अक्षरश: तुटून पडले आहेत.

“काळजी घ्या… बरे होऊन परत आले की खानदेशातही तसेच दवाखाने उपलब्ध करा म्हणजे धावपळ होणार नाही.. खानदेशात भरपूर काय करण्यासारखे आहे..” असा सल्ला ठाण्याचे प्रदीप रमेश शिरसाठ यांनी दिला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे हर्षद म्हसके लिहितात की, “साहेब तुम्ही स्वतःच्या मतदार संघात उत्कृष्ट दवाखान्याचे काम केले असते, तर मुंबईला येण्याची गरज लागली नसती. तुमची सोय झाली, जनतेचे काय..?”

अशोक नावाचा नेटकरी लिहितो, “खानदेशात एकही हॉस्पिटल चांगले नाही म्हणजे, लवकर बरे व्हा आणि सुसज्ज सरकारी हॉस्पिटल काढा किंवा सामान्य रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करा.” ट्रान्स ऑफ इंडिया या अकाऊंट हँडलरने, “हो, पण साहेब, आपण मुंबईसारखे दवाखाने आपल्या जिल्ह्यात उभारले नाही, हे तुमच्या कामाचे प्रमाणपत्र नाही का?” अशा शब्दात टीका केली आहे.

एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात जवळपास चाळीस वर्षे सक्रिय होते. महाराष्ट्रात पक्ष वाढीत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच एकनाथ खंडसे यांचा महत्वाचा वाटा आहे. 1995 मध्ये सत्तेत आलेल्या शिवसेना – भाजप युती सरकारमध्ये खडसे पाटबंधारे (आताचे जलसंपदा) मंत्री होते. खांदेशातील सुलवाडे, प्रकाश आणि सरंगखेडा या धुळे जिल्ह्यातील तीन बॅरेजसह जळगाव जिल्ह्यातील पदळसरे या महत्वाच्या बॅरेजचे काम मार्गी लागले. यानंतर खडसे तब्बल पंधरा वर्षे विरोधी बाकावर होते.

मोदी लाटेत महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजप – शिवसेना सरकार सत्तेत आले. पक्ष नेतृत्वाने अनुभवी खडसे यांच्या ऐवजी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आणि खडसे यांच्याकडे महसूल आणि कृषीसह अल्पसंख्यांक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, सत्तेत येऊन दोन वर्ष ही होत नाही तोच त्यांच्यावर गैर मार्गाने उद्योग विभागाची जमीन खरेदीचा आरोप झाला आणि त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. काही आरोपातून त्यांना क्लीन चिट मिळाली तरी फडणवीस यांनी सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत खंडसे यांना मंत्रिमंडळात घेतले नाही आणि 2019 च्या निवडणुकीत पुनः पक्षाची उमेदवारी ही दिली नाही.

पक्षातील राजकारणाला कंटाळून खडसे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये भाजपाला रामराम केला आणि त्यावेळी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीतील खूप वर्षे विरोधी पक्षात गेल्याने ते त्यांच्या गृह जिल्ह्यासाठी फार काही करू शकले नाहीत. मात्र, फडणवीस सरकारमध्ये असताना दोन वर्षातही खडसे जिल्ह्यात मोठा प्रकल्प आणू शकले नाहीत, अशी टीका सामान्य जनतेकडून नेहमीच केली जाते.

त्यामुळेच विरोधी पक्षात असल्यावर मुख्यमंत्री यांचे जाहीर आभार मानताच नेटकरी खडसे यांच्यावर तुटून पडल्याचे दिसते आहे.

Avatar

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
विश्लेषण महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नवाबांसाठी अजित पवारच (म)मालिक?

@vivekbhavsar मुंबई मनी लॉन्ड्रीग आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी असलेल्या कथित संबंधामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादी