मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवतीर्थावर झालेल्या भेटीत दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू आहे. याआधी मनसे नेते बाळा नांदगावकर सागर बंगल्यावर गेले होते. त्यानंतर आज आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
या चर्चेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना तुम्ही एनडीएसोबत जाणार का? असा सवाल करण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. आजचा विषय वेगळा आहे. वेगळ्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. जेव्हा निवडणुकीचा विषय येईल, तेव्हा त्यावर बोलेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या या विधानाने ते भाजपसोबत जाण्याच्या चर्चांचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.
आज सकाळी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असताना शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांना सोबत घ्यायचं भाजपचं ठरलं आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्यानेच आशिष शेलार राज यांच्याकडे निरोप घेऊन आल्याची जोरदार चर्चा रंगली.