मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा समाज शिक्षण, वाचन आणि गुणवत्ता यावर भर देत सतत प्रगती करत आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या समाजातही समाजविघातक उत्सवी ध्वनिप्रदूषणाची प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. त्यामुळे खऱ्या आंबेडकरवादी विचारसरणीला अनुसरून, डीजेमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा आग्रह धरण्याची गरज आहे, असे मत कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील माने यांनी व्यक्त केले.
समाजासाठी निधी योग्य ठिकाणी वापरण्याची गरज
सरकारने मागास समाजाच्या शिक्षण, नोकरी आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केले असताना, अशा समाजघटकांनी आपले प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. धमक्यांना भीक न घालता, डीजेवर होणारा अनाठायी खर्च टाळून तो निधी समाजाच्या प्रगतीसाठी वापरणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत आपण यासंदर्भात सुरू केलेल्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळताना दिसत आहे, असे माने यांनी सांगितले.
डीजे बंदीबाबत पोलिस आयुक्तांशी चर्चा
डीजे बंदीबाबत आपण नुकतीच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी डीजेवर बंदी घालून ती यशस्वीपणे अंमलात आणल्याची कागदपत्रे आपण त्यांना सादर केली आहेत. मात्र, महाराष्ट्रात याबाबत अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती माने यांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित
महाराष्ट्रात डीजेवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आपण जनहित याचिका दाखल केली असून ती प्रलंबित आहे. हा विषय समाजहिताचा असल्याने आपण त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू, असेही माने यांनी स्पष्ट केले.
“बाबासाहेबांचा विचार हाच आपला खरा वारसा”
“बाबासाहेबांची बदलाची ताकद आणि अभ्यासूवृत्ती हाच आपला खरा वारसा आहे. तो संपूर्ण जगात कुणालाही मिळालेला नाही. त्याचे भान आले की आपण निम्मी लढाई जिंकली असे समजा,” असे मत व्यक्त करत वारज्यातील आंबेडकरवादी जनतेने डीजेमुक्त जयंतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल माने यांनी त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले.