मुंबई : शिवसेना सदस्य बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव आपणाकडे प्राप्त झाला असून यासंदर्भात मंत्री गोरे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यानंतर याबाबत सभागृहात निवेदन केले जाईल, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी सभागृहात दिली.
लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना ३० जून रोजी चुकीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावाची सूचना दिली होती.
यासंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले की, लक्षवेधी सूचनेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ग्रामविकास मंत्री गोरे यांनी, “मी कधीही चुकीचे उत्तर देत नाही,” असे वक्तव्य केले होते. मात्र, त्या वेळी मी वारंवार सांगत होतो की, चुकीचे उत्तर दिले जात आहे. तरीही चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप कडू यांनी केला.
संगणक परिचालकांना मिळणाऱ्या रकमेबाबत मंत्री गोरे यांनी “ते पैसे कमिशन म्हणून मिळतात,” असे उत्तर दिले होते. प्रत्यक्षात संगणक परिचालकांना अशा स्वरूपाचे कमिशन मिळत नाही, याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे कडू यांनी सभागृहात सांगितले.
संबंधित आस्थापनाला देण्यात येणारे ८४ कोटी रुपये संगणक परिचालकांना द्यायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, त्या वेळीही चुकीचे आणि दिशाभूल करणारे उत्तर देण्यात आले, असा दावा कडू यांनी केला.
“चुकीची माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल करणे हा सभागृहाचा हक्कभंग आहे. त्यामुळे हा हक्कभंग प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्यात यावा,” अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
यावर सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित प्रस्तावावर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून खुलासा मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले. खुलासा प्राप्त झाल्यानंतर या विषयावर सभागृहात निवेदन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

