X : @ajaaysaroj
मुंबई: शिवसेना भाजपचा पालघर लोकसभा मतदारसंघातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसताना आज बहुजन विकास आघाडीची राजेश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. महाविकास आघाडीने इथून भारतीताई कामडी यांना उमेदवारी दिली आहे, तर महायुतीमध्ये या जागेवरून घमासान सुरू असल्याने महायुती उमेदवार उभा न करता बविआच्याच उमेदवाराला पाठिंबा देते का अशी चर्चा देखील सुरू झाली आहे. अर्थात ही शक्यता फारच कमी आहे.
राजेश पाटील हे सध्या बोईसर येथील बविआचे आमदार आहेत. या पूर्वी त्यांनी वसई पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. बविआमधील युवा नेतृत्वापैकी ते एक समजले जातात. या जागेसाठी बविआकडून सात जणांनी इच्छा प्रदर्शित केली होती. मागच्या आठवड्यात बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रअप्पा ठाकूर, ज्येष्ठ नेते राजीव पाटील व आजीव पाटील यांनी या सर्व सात जणांशी चर्चा करून एकच सर्वसंमतीचा उमेदवार ठरवायला सांगितला. त्याप्रमाणे माजी खासदार बळीराम जाधव यांनी आमदार राजेश पाटील यांचे नाव सुचवले व माजी मंत्री मनीषाताई निमकर यांनी पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला.
बहुजन विकास आघाडीने जिल्ह्यात विकासाचा अजेंडा राबवला आहे, असे वक्तव्य पालघर लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर आमदार राजेश पाटील यांनी केले. माजी खासदार बळीराम जाधव यांनी डहाणूपर्यंत लोकल सेवा आणण्यासाठी प्रयत्न केले. या अगोदर असा प्रयत्न कोणीच केला नव्हता, वसईतला गॅस गुजरातला जायचा मात्र तो इथल्या लोकांना वापरायला मिळत नव्हता. आता गुजरातची गॅस पाईपलाईन पालघर जिल्ह्यासाठी आणण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय सॅटॅलाइट सिटीसाठी वसई महानगरपालिकेला ३०० कोटी रुपयांचा निधी त्यांनी आणला असे पाटील यांनी स्पष्ट केले. आज फक्त मी अर्ज दाखल केला आहे. आमच्या पक्षातील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे मी रिंगणात आहे असे नाही तर बहुजन विकास आघाडी व आमचे नेते हितेंद्र ठाकूर हे रिंगणात आहेत , अशी माझी धारणा असल्याचे आमदार पाटील यांनी प्रांजळपणे सांगितले.
पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू, विक्रमगड, पालघर, नालासोपारा, बोईसर आणि वसई हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. डहाणू, पालघर व विक्रमगड या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत, तर वसई, नालासोपारा व बोईसर येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ इतकी घसघशीत मते मिळाली होती. एकूण मतदानाच्या ४७ टक्के मतं बविआने पटकावली होती हे इथे महत्त्वाचे आहे. भाजप – शिवसेना युती एकत्र असताना राजेंद्र गावित इथून निवडून आले होते. बविआची इथे हक्काची पाच लाखाच्या घरात मतं आहेत. त्यामुळे शिवसेना – भाजप – राष्ट्रवादी महायुती येथे स्वतः उमेदवार देते की बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देऊन बेरजेचे राजकारण खेळते हे बघणे औत्सुक्याचा विषय आहे.