X: @therajkaran
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून भाजपशी हातमिळवणी केलेल्या अजित पवारांना (Ajit Pawar) धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यांनी भाजपसोबत (BJP) जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला त्यांच्या कुटुंबियांनीही विरोध केला आहे. त्यानंतर आता त्यांच्याच गटातील नेतेही त्यांची साथ सोडत आहेत. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर करीत आहे” असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.
बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार (Sharad pawar) यांच्या संपर्कात होते. पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते. मात्र आता महायुतीमधील सगळी चित्रं बदलल्याचं दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याची आश्वासन त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे हे नाराज होते. त्यांची हीच नाराजी पक्षबदलासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार आहेत. अजित पवार गटातील आउटगोइंचा फायदा शरद पवार गटाला किती होईल हे येणाऱ्या काळात समजणार आहे.
दरम्यान, यापूर्वी अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांनी (Shrinivas Pawar) अजित दादांच्या भूमिकेला विरोध केला. त्यानंतर त्यांच्या पत्नी शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी सुद्धा ‘आपल्याला फक्त साहेबांना विजयी करायचं’ आहे, असं म्हणत शरद पवारांसोबत उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे.