X: @therajkaran
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांची भेट घेतल्यानंतर दोन जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र त्यांचा हा प्रस्ताव शाह यांनी फेटाळला आहे. मनसेला एकच जागा देता येईलं असे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या या भूमिकेवर आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.
मनसेला केवळ एक जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शाह यांनी राज ठाकरेंना सांगितलं. तसेच, लोकसभेनंतर पुढे कसे जायचे याबद्दलही विचारलं असता त्यावर, या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही, असंही अमित शाह राज ठाकरेंना म्हणल्याचे समजते. त्यामुळे दिल्लीतील भेटीत ठाकरे यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
दरम्यान विधानसभा (Vidhan Sabha) देखील आपण एकत्र लढवू पण तेव्हाचं जागावाटप तेव्हा ठरवू असंही शाह म्हणाले. याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळली आहे.
राज ठाकरे दिल्लीत अमित शाह यांना भेटले. त्यापूर्वी त्यांची देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत बैठक झाली होती. फडणवीसांसोबतच्या बैठकीत जवळपास निश्चित झालं होतं की, आता नेमकं कसं पुढे जायचं आहे. हे सर्व ठरल्यानंतरच राज ठाकरे दिल्लीला गेले. तिथे अमित शाहांसोबत युतीबाबत आणि आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली. सुरुवातीला मनसेनं (MNS) तीन जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती होती. मुंबईतील बैठकीतच राज ठाकरेंना तीन जागांसाठी स्पष्ट नकार देण्यात आला होता. त्यानंतर आता शहांसोबतच्या बैठकीतही राज ठाकरेंचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. एकच जागा देणं शक्य असल्याचं अमित शहांनी सांगितलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP), शिंदे (Shiv Sena Shinde Group) आणि अजित पवार (NCP Ajit Pawar Group) यांच्या महायुतीत (Mahayuti) आता मनसे सामील होणार का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित राहिला आहे.