X: @therajkaran
शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शड्डू ठोकला आहे. या मतदारसंघात अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे, अशी घोषणा दिलीप मोहितेंच्या बंगल्यातील बैठकीत करण्यात आली आहे. त्यामुळे आता आढरावांना उभं करुन दादा सध्या शिरूरमधून अमोल कोल्हेंना पाडणार का? अजितदादा शिरूरची बाजी मारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांवर 2009 आणि 2014 साली शिरूरच्या मतदारांनी विश्वास टाकला. हॅट्रिकसाठी 2019 मध्ये उभे राहिलेल्या आढळरावांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांच्यासोबत बारी झाली. अपेक्षेनुसार कोल्हेंनी बाजी मारली. पण कोल्हेंना निवडून आणण्यात अजित पवारांचाचा हात होता. कोल्हेंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केल्याचं अजित पवारांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलं आहेच. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत ज्या उमेदवाराला निवडून आणलं, त्यालाचा पाडण्याचा चंग अजितदादांनी या निवडणुकीत बांधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) अंतर्गत बंडाळीनंतर अमोल कोल्हे शरद पवार गटात (Sharad Pawar Group) गेले. त्यानंतर आता शिरुरमध्ये महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे, पाडणारच असं म्हणत अजित पवारांनी थेट शड्डूच ठोकला होता. तेव्हापासूनच शिरूरवर संपूर्ण राज्याच्या नजरा खिळल्या आहेत. एवढंच नाहीतर या मतदार संघावरुन महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळाला. पण, त्यानंतर शिरूर मतदारसंघ अजित पवारांना सोडण्यात आला. अशातच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या आढळरावांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आता शिवाजीराव आढळराव आणि माझं बोलणं झालंय. ते खासदार झाल्यावर आमदारांच्या कामात अडथळा आणणार नाहीत, त्यामुळे शिरूरमधून आढळरावच उमदेवार असतील, असं अजित पवारांनी थेट सांगितलं आहे.