X: @therajkran
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj)
काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackderay) प्रथमच कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. उद्या गुरुवारी ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलेल्या माहितीमुळे उद्धव ठाकरे महाराजांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राजवाड्यावर महाराज आणि उद्धव ठाकरे यांची भेट होईल. या भेटीवेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह शिवसेना उपनेते संजय पवार यांची उपस्थिती असणार आहे. या भेटीमध्ये अर्थातच कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने तसेच हातकणंगले लोकसभेच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीची राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी शाहू महाराजांच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्याचा दोन दिवसीय दौरा केला. पहिल्या टप्प्यातील या दौऱ्यात तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी अनेक शेतकरी, कामगार बांधव व महिला भगिनींशी देखील संवाद साधला. शाहू छत्रपती महाराजांच्या रूपाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचे वारे वाहत असून सर्वसामान्य जनतेच्या भावनेतून महाराजांच्या विजयाची निश्चिती मिळाली, अस संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.