X: @therajkaran
एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) बारामतीतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. महायुतीकडून बारामतीची जागा अजित पवार गटाला (Ajit Pawar) देण्यात येणार आहे. त्यात आता शिंदे गटात असलेल्या विजय शिवतारेंनीच अजित पवारांविरोधात शड्डू ठोकला आहे. मात्र विजय शिवतारेंच्या निर्णयामुळे बारामतीत (Baramati) अजित पवारांना मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.
आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली. एवढेच नव्हे तर बारामतीच्या जागेवरून अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना ब्लॅकेमल करत असल्याचा गौप्यस्फोटच शिवतारे यांनी केला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजित दादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. कशाला करतो? लढ ना तुझ्या ताकदीवर, असं आव्हान देतानाच माझा पाठिंबा जनतेला आहे, जनता सांगेल ते करणार, महायुतीचा धर्म निभवायचा की नाही याबाबत मी दोन-चार दिवसात माझी भूमिका व्यक्त करणार आहे, असं विजय शिवतारे म्हणाले.
दोन-तीन दिवसानंतर माझी पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. लोकांशी चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले. मी कुणासाठी लढत होतो? गुंदवलीच्या पाण्यासाठी लढत होतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. इतका नालायकपणा आणि इतका हेकेखोरपणा त्यांनी केला. त्यात माझी किडनी गेली आणि हार्ट गेलं. तरीही मी त्यांना माफ केलं. पण पुरंदरची जनता त्यांना माफ करणार नाही. बारामतीची जनता त्यांना माफ करणार नाही. हा हेकेखोरपणा आहे, असा हल्लाच शिवतारे यांनी चढवला आहे. अजित पवार हा अत्यंत अहंकारी माणूस आहे. नालायक माणूस आहे. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला बोललो, त्यावर मी आजही ठाम आहे. माझा कायम या व्यक्तीला विरोध असेल, असंही शिवतारे यांनी म्हटलं आहे.