X : @ajaaysaroj
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेऊन आल्यानंतर शिवसेनेचे नेते विजयबापू शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. अजित पवार हे नालायक आणि उर्मट माणूस असून अशी घाणेरडी राजकीय अपप्रवृत्ती संपवणारच असा घणाघात शिवतारे यांनी केला आहे.
गेल्या चाळीस वर्षांत पवारांच्या विरोधात उभे राहण्याची कोणाची हिंमत झाली नाही. सततची सत्ता आणि सत्तेतून निर्माण झालेली अराजकता संपवण्याची संधी चालून आली आहे, असे मतदारसंघातील जनतेला वाटते आणि यासाठी विजयबापूने उभे राहावे, अशी जनतेची इच्छा आहे. ही अराजकता संवण्यासाठीच मी उभा राहणार आहे, असे विजयबापूंनी स्पष्ट केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) गणिते संपूर्णपणे बदललेली आहेत, मी उभा राहिलो नाही तरी देखील अजित पवारांचा (Ajit Pawar) पराभव निश्चित आहे. तब्बल पावणे सहा लाख मतदार हे पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहेत, त्यामुळे येथे युतीचा पराभव होईल पण मी उभा राहिलो तर ही जागा निवडून येऊ शकते, महायुतीमध्ये एक जागा वाढू शकते याचे समीकरण मी आमच्या पक्षश्रेष्ठींच्या नजरेस आणले असून आजतरी निवडणूक लढवण्याच्या माझ्या निर्णयात बदल झालेला नाही, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी जाहीरपणे मला, ‘तुझा आवाका किती, तू कोणासमोर बोलतो किती, आता तू निवडून कसा येतो तेच बघतो.’ असे म्हणत उर्मट भाषा वापरली होती. आता माझा आवाका किती आहे, तेच पवारांना दाखवायची आणि अराजकता संपवण्याची संधी माझ्या रूपाने संपूर्ण जनतेला मिळाली आहे, असे प्रतिपादन शिवतारे यांनी केले. ही लढाई अन्यायाविरुद्ध असून, दडपशाही विरुद्ध सामान्य जनता असा हा सामना असल्याचे सांगत जनतेच्या मनात पवारांच्या विरोधात प्रचंड रोष आहे, त्यांनी चाळीस वर्षे लोकांना छळले आहे, असे सांगून ही ऐतिहासिक संधी साधणे म्हणूनच गरजेचे असल्याचे आपण श्रेष्ठींना सांगितले आहे, असे विजय बापूंनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी अकरा कारखाने लुटून खाल्ले, शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे खाल्ले, कर्मचाऱ्यांचे पगार खाल्ले, अशा या लुटारू प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी आपली उमेदवारी असून, मतदारसंघात जनेतशी बोलून येणाऱ्या चार दिवसांत आपली अंतिम भूमिका स्पष्ट करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवले असल्याचे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.