X: therajkaran
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिल आहे. लोहा लोहे को काटता है, हे त्यांनाच माहीत आहे असं नाही, आम्हालाही माहीत आहे. आमच्या हातात जेव्हा ईडी, सीबीआयसह सत्ता येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष (BJP) संपलेला असेल, अशा शब्दांत गंभीर इशारा राऊतांनी दिला आहे.
राऊत यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचार पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्पण देणारी पार्टी आणि भ्रष्टाचारी काम करणारी पार्टी, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी आरशात बघितलं तर त्यांना फक्त भ्रष्टाचार दिसणार, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्या दिवशी आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकावे, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा” असेही राऊत म्हणाले.
भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष आहे, त्यांच्याकडे स्वतःची पोरं नाहीत. ते सर्व आमची फोडलेली पोरं घेऊन ते बसले आहेत. भाजपाने स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवावेत, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नये, नाहीतर ते पुन्हा पळून जातील, असे टीकास्त्र राऊत यांनी सोडले. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर जागावाटप बद्दल बोलताना ते म्हणाले, जागावाटप संपलेले आहे. नेहरू सेंटरमध्ये आम्ही सर्वजण होतो. फायनल कागद तयार झाला, त्यामध्ये रामटेकची जागा काँग्रेसला निश्चित झालेली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील. कोल्हापूर ही आमची सिटींग जागा आहे. चंद्रहार पाटील उमेदवार घोषित केले आहे. या विद्यमान असलेल्या जागेवर चंद्रहार पाटील या डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीगीर यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे. प्रकाश आंबेडकरांबरोबर काँग्रेस चर्चा करत आहे. ते कालच्या सभेला आले होते, ही सकारात्मक गोष्ट आहे, असेही राऊत म्हणाले.