X: @therajkaran
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या मुद्द्यांवर भाष्य करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिलेल्या मी पुन्हा येईन… या घोषणेवर विधान केलं आहे. ते म्हणाले, आपल्याला पुन्हा यायला अडीच वर्ष लागले, मात्र येताना दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो… असे विधान त्यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी चिन्ह होती. परंतु, अंतर्गत वादामुळे महाविकास आघाडीची स्थापना झाली. महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेना (Shivs sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी( NCP) पक्ष एकत्र आले. अडीच वर्षे महाविकास आघाडीने सरकार चालवलं. परंतु, जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर लागलीच वर्षभराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फोडून मी पुन्हा आलो असं फडणवीस म्हणाले.
सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. यशासारखे काहीही यशस्वी होत नाही, असं म्हटलं जातं. मी पुन्हा येईन असं म्हटलं होतं. आम्ही निवडून आलो. पण आमचं सरकार स्थापन झालं नाही. त्यामुळे आम्हाला काहीजण अहंकारी म्हणाले. हे तर राजकारणात सुरुच राहतं”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा हा व्हीडिओ शेअर करत विरोधकांनीही टीका केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राज्यातील पक्ष आणि कुटुंबं फोडाफोडीचे महामेरू कोण आहेत याबाबत लोकांमध्ये चर्चा होती. पण आज खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच याची कबुली दिल्याने लोकांमधील चर्चेवर शिक्कामोर्तब झालं. पण फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची निती राबवणाऱ्या भाजपाला (BJP) राज्यातील स्वाभिमानी जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!” असे त्यांनी सांगितले.