X: @therajkaran
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्याबाबत एकमत झाल्यानंतर सांगलीमध्ये (Sangli Lok Sabha) वादाची ठिणगी पडली आहे. या जागेवरून काँग्रेस आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, सांगली मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेसच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्याही मित्रपक्षांनी दावा करू नये, आम्ही आमच्या जागेसाठी ठाम आहोत, अशा शब्दात त्यांनी खडसावले आहे.
मागील काही दिवसापूर्वीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत दिले होते. यानंतर सांगलीमध्ये काँग्रेसच्या गटामध्ये खळबळ उडाली. यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने जाहीर झाल्याने विश्वजीत कदम यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सांगलीची जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. उमेदवाराला विचारांची पाठराखण लागते. सांगलीकरांनी यावर निर्णय घेतला असून काँग्रेसची या ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये ताकद आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की संजय राऊत हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत. ते वैयक्तिक काही सांगत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र आम्ही जागा सोडणार नाही. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जागावाटपावरून भाष्य केले होते. जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली असून सांगलीची जागा शिवसेना लढवणार असून त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कोल्हापूर ही आमची जागा काँग्रेसला देण्यात येणार आहे. कोल्हापुरात शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला देण्यात येईल. त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केल्याचे म्हटले होते. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरु असल्याचेही ते म्हणाले होते.