X : @milindmane70
रायगड लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत विजय संपादन करून देखील हाती काही लागले नाही, विरोधात गेलेल्या शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय जनता पक्षाकडून सहकारी मिळेलच याची खात्री नसल्याने विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार) सुनील तटकरे यांनी पुन्हा लोकसभेत न जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या ऐवजी ते कन्या आदिती तटकरे हिल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असून याबाबतची अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरोधात आदिती तटकरे असा सामना रंगणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सन 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांच्याकडून सुनील तटकरे यांचा केवळ 2110 मताने पराभव झाला होता. त्याचा वचपा तटकरे यांनी 2019 च्या निवडणुकीत काढला. तटकरे यांनी 31,438 मतांच्या फरकाने विजयी संपादन केला. मात्र विजयाचा गुलाल तटकरेंच्या अंगावर फार काळ राहिला नाही. कारण 2020 मध्ये आलेली कोविडची साथ 2021 पर्यंत कायम होती. मात्र पाच वर्षाच्या कारकिर्दीत तटकरेंकडे सांगण्यासारखे काहीही नाही. पक्षातील दबाव तंत्रामुळे ते कमी पडले की काय अशी शंका आता उत्पन्न होत आहे. सन 2019 च्या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये आदिती तटकरे यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी मिळाली. मात्र, रायगड मधील शिंदे समर्थक आमदार गोगावले, महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला वारंवार विरोध केला. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे या तिन्ही आमदारांचे काही चालले नाही. जुलै 2022 मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले व शिंदे – फडणवीस सरकार सत्तेवर आले.
शिवसेनेनंतर दीड वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली व अजित पवारांचा गट शिंदे – फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत सामील झाला. लागलीच पुन्हा आदिती तटकरे या राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्या तर विद्यमान खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. मात्र लोकसभा निवडणूक लढविणार की नाही याबाबत तटकरेंच्या मनात द्विधा मनस्थिती आहे. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवताना मुस्लिम, आगरी, कोळी, कुणबी, मराठा, दलित,ओबीसी, धनगर या समाजातील प्रश्नांकडे खासदार म्हणून सुनील तटकरे यांचे पाच वर्षात दुर्लक्ष झाले. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात जनतेकडून मोठ्या प्रमाणावर तटकरेंच्या तक्रारींचा पाढा वाचला जात आहे.
या मतदारसंघात जवळपास चार लाख मुस्लिम मतदार आहेत. तर शेतकरी कामगार पक्षाचे सुमारे दीड लाख मतदान आहे. त्याचबरोबर दोन लाखाच्या आसपास कुणबी समाजाचे मतदान आहे. या सर्व समाजाची मोट बांधण्याचे काम स्वतः उमेदवार असताना सन 2019 च्या निवडणुकीत झाले होते. मात्र पाच वर्षाच्या कारकिर्दीत या मतदारांच्या आशा – आकांक्षावर पूर्णपणे पाणी फिरल्याने त्यात तटकरे यांनी पक्ष बदलून भाजपाशी जवळीक साधल्याने मुस्लिम मतांची मोट तटकरे कशी बांधणार? हा प्रश्न आहे. मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अनंत गीते यांच्यासाठी कुणबी समाजाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या मतांमध्ये फूट न पडता एकगठ्ठा मतदान समाज म्हणून अनंत गीते यांना करण्याचा निर्धार या मतदारसंघातील कुणबी बहुल गावांमधून करण्यात आला आहे. त्यासाठी कुणबी समाजाच्या गाववाड्यांवर बैठकांचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात तब्बल 18 लाख मतदार असून 65 टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. वाढती पाणीटंचाई, उष्णता याचा अंदाज घेता मतदानाचा जोर कायम राहण्यासाठी सर्वच पक्षांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
भाजपा कार्यकर्ते काय करणार?
दक्षिण रायगड भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासाठी रायगड ची जागा सोडावी अशी आग्रही मागणी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याची असल्याने दक्षिण रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व गुहागर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते आता कोणता निर्णय घेणार याबाबत तटकरेंच्या मनात देखील शंका असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या मतदारसंघातून आपला पराभव झाला तर तटकरेंच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचे गंभीर परिणाम होतील, याचा अंदाज खासदार सुनील तटकरे यांना आल्याने त्यांनी त्यांच्या ऐवजी मुलीला उभे करून या मतदारसंघातील जनतेचा कौल घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.