महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरे दिल्लीत, मनसे महायुतीची बोलणी अंतिम टप्प्यात

तीन जागेची मागणी

X : @ajaaysaroj

मुंबई: भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी महायुती बरोबरची मनसे युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून मनसेने तीन जागांची मागणी केली आहे असे समजते. नाशिक, दक्षिण मुंबई बरोबर थेट डॉ श्रीकांत शिंदे यांचा कल्याण मतदारसंघ मनसेने मागितला आहे अशी चर्चा सुरू आहे.

राज्यात सातत्याने भाजप आणि मनसे युती होणार अशा बातम्या माध्यमातून येत असतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्य भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार हे अधून मधून राज ठाकरे यांच्या घरी पायधूळ झाडून ही चर्चा आणि हा विषय माध्यमात राहील याची काळजी चाणाक्षपणे घेत असतात. शिवसेनेच्या महाफुटीनंतर राज देखील विविध कामांच्या निमित्ताने मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी गाठी घेत होते. यातून महायुतीला पाठिंबा द्यायचा की फक्त शिवसेने बरोबर युती करायची अशी चाचपणी ही सुरू होतीच असे बोलले जाते. पण येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आता हा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. मनसे आता निश्चितपणे महायुतीमध्ये सामील होत असून त्यांनी नाशिक, दक्षिण मुंबई व कल्याण या तीन जागांची मागणी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात छातीठोकपणे बोलले जात आहे.

नाशिक महापालिकेत एक टर्म मनसेने सत्ता गाजवली आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांचा करिष्मा आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेची मागणी मनसेने केली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, वरळी, शिवडी या तीन विधानसभा मतदारसंघात असलेला मराठी टक्का राज ठाकरे यांच्या रूपाने महायुतीला बोनस ठरू शकेल अशी मांडणी मनसेकडून केली जात आहे.

मुख्यमंत्री पुत्र डॉ श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये दुसऱ्या टर्मचे खासदार आहेत. खूप मोठया प्रमाणावर त्यांनी या मतदारसंघात निधी खर्च करून अनेक विकासकामे केली आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील या लोकसभा मतदारसंघात डॉ शिंदे यांनी रेलचेल केली आहे. अंबरनाथचा शिवमंदिर फेस्टिव्हल मुळे ते घराघरात पोहचले आहेत. स्वतः डॉक्टर असल्याने सुशिक्षित वर्गात देखील त्यांचा बोलबाला आहेच.

ते तोंडाने फटकळ आहेत असा गोबेल्स थाटाचा प्रचार त्यांचे विरोधक जाणूनबुजून करत असतात. बांधकाम व्यवसायात असलेला एक वर्ग देखील त्यांच्यावर नाखूष आहे, अशी चर्चा देखील येथे मुद्दाम घडवली जात आहे. एवढे सगळे असले तरी कामाच्या बाबतीत खासदार डॉ शिंदे वाघ आहेत हे कोणीही मान्य करेलच. डोंबिवलीमध्ये भाजपची कार्यकर्ता पातळीवर डॉ श्रीकांत शिंदे या व्यक्ती विरोधात कितीही छुपी नाराजी असली तरी अबकी बार चारसौ पार करण्यासाठी भाजपचा मतदार हा महायुतीच्या उमेदवारालाच मतदान करेल यात शंका नाहीच.

पण उल्हासनगर आणि कल्याण पूर्व या मतदारसंघातून जास्त मते मिळवण्यात यावेळी त्यांना त्रास होऊ शकतो, अशी चर्चा येथे ऐकायला मिळते. नुकत्याच घडलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड व डॉ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेना कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांचा गाजलेला आणि गोळीबार करण्यापर्यंत गेलेला पराकोटीचा वाद यामुळे येथील मतदानावर परिणाम होईल, अशी शंका येथील पदाधिकारी व कार्यकर्ते बोलून दाखवतात. कल्याण ग्रामीणमध्ये तर मनसेचे राजू पाटील विद्यमान आमदार आहेत. त्यांचे कल्याण पूर्व आणि उल्हासनगर या दोन्ही मतदारसंघात देखील चांगले बस्तान आहे. त्याच प्रमाणे अंबरनाथ, डोंबिवली येथेही मनसेचा स्वतःचा असा मतदार आहेच.

मुंब्रा कळवा या मतदारसंघात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विद्यमान आमदार असले तरी मनसेची कळवा येथे स्वतःची वोट बँक आहे. गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांचा वाद, डोंबिवलीमधील भाजप कार्यकर्त्यांची नाराजी , मुंब्रा येथील एकगठ्ठा मुस्लिम बहुल मतदान असे अनेक फॅक्टर ही जागा मागताना मनसेने महायुती समोर ठेवले असल्याची चर्चा आहे. मनसेबरोबर महायुती झालीच तर डॉ श्रीकांत शिंदे यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघात उतरवून ठाणे हे कायमच शिवसेनेचे आहे यावर शिक्कामोर्तब करायचे अशी राजकीय खेळी शिवसेनेने आखली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मनसेबरोबर खरंच युती झाली तरी त्यांना तीन जागा द्यायच्या, की आत्ता लोकसभेच्या एक किंवा दोनच जागा देऊन विधानसभेच्या जास्त जागांचे आश्वासन द्यायचे हे फडणवीस, शिंदे आणि राज ठाकरे यांच्या अंतिम बोलण्यातच ठरणार असले तरी मोदी आणि शाह यांचा हिरवा कंदीलच त्यामध्ये महत्त्वाची भूमिका वटवणार आहे.

राज ठाकरे हे दिल्लीत गेले आहेत. खरं खोटं काय हे येणाऱ्या दोन दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात