मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल रविवारी १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. यावेळी इंडिया आघाडीचे नेते उपस्थित होते. सर्वांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला आणि शक्तिप्रदर्शन केलं.
या सभेत राहुल गांधींनी भाजपवर खरमरीत टीका केली. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचा एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडण्यापूर्वी माझ्या आईला भेटला आणि रडला. मी त्यांचं नाव घेणार नाही. ते याच राज्यातील आहेत. माझ्या आईले ते रडत रडत म्हणाले की, सोनियाची मला लाज वाटते. माझ्यात यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मला तुरुंगात जायचं नाही. या वरिष्ठ नेत्याने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधींनी अशोक चव्हाणांचं नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
या सभेनंतर आताच काँग्रेसमधून भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी सभेत बोलताना कुणाचं नाव घेतलं नाही. मात्र जर ते माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी सोनिया गांधींना भेटलो नाही.त्यामुळे मी त्यांना भेटून काही भावना व्यक्त केली हे विधान दिशाभूल करणारं आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस कार्यालयात काम करीत होतो. त्यामुळे मी पक्ष सोडणार असल्याचं शेवटच्या क्षणापर्यंत कुणालाच माहीत नव्हतं. मी विधानसभा अध्यक्षांना आमदारकीचा राजीनामा दिला, त्यानंतर ही माहिती समोर आली. राहुल गांधींनी जर हे विधान माझ्याबद्दल केलं असेल तर ते चुकीचं आहे.