X: @vivekbhavsar
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकारणाच्या आणि आरोप – प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त धनंजय मुंडे आहेत. जणू काही ही हत्या धनंजय मुंडे यांनीच केली आहे, असे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आरोप करणाऱ्यांमध्ये जे नेते आघाडीवर आहेत, त्यात सुरेश धस अग्रस्थानी आहेत. त्यांच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक मीडियातील आमचीच काही मंडळी देखील सामील झाली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी ही अभद्र युती तयार झाली आहे. काहीही करून मुंडे यांचे राजकीय करिअर संपवायचा विडाच या अभद्र युतीने उचलला आहे असे दिसते आहे. यांना न्यायपालिका आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही, आम्ही सांगू तेच खरे आणि तेच व्हायला हवे, या पद्धतीने ही मोहीम राबवली जात आहे हे दुर्दैव आहे.
वास्तविक देशमुख प्रकरणांमध्ये वाल्मीक कराडसह अनेक संशयितांना अटक झाली आहे. पोलिस त्यांचे काम करत आहे. सरकार आपल्या पातळीवर या प्रकरणाची चौकशी करत आहे. परंतु यावर अविश्वास दाखवून सुरेश धस आणि कंपू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरत आहे. वाल्मीक कराड फरार असताना कराडला जणू काही मुंडे यांनीच गायब केले, अशा पद्धतीने आरोप झालेत. कराड सापडल्यानंतर नवीन मुद्दा हवा होता, मग कृषी खात्यातील कथित घोटाळा बाहेर काढण्यात आला. अव्वाच्या संवाद दराने केलेली खरेदी, खतांमध्ये भ्रष्टाचार केला असे एक ना अनेक आरोप करण्यात येऊ लागले. आरोप करणाऱ्यांमध्ये नंतर अंजली दमानिया सहभागी झाल्यात. दमानिया ताईंनी तर सनसनाटी आरोपांची मालिका सुरू केली. पोलीस कस्टडीत आरोपींचा मृत्यू होणार, तीन आरोपींचा एन्काऊंटर होणार, असे एक ना अनेक आरोप करून त्यांनी या प्रकरणाला वेगळेच वळण लावण्याचा प्रयत्न केला. त्यांचेही टार्गेट एकच – धनंजय मुंडे आणि जोपर्यंत मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी गर्जना देखील अंजलीताई यांनी केली.
वरवर हे प्रकरण संतोष देशमुख हत्या आणि धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांचा त्यातील सहभा, असे भासत असले तरी यामागे मराठा विरुद्ध ओबीसी या राजकीय संघर्षाची किनार आहे. बीड जिल्ह्यातील मुंडे बंधू – भगिनी एकत्र आले आहेत, दोघांमधील राजकीय संघर्ष संपला आहे, दोघेही राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि हीच गोष्ट अनेकांना सहन होत नाहीये. खास करून मराठवाड्यातील मराठा समाजातील नेत्यांना हे पचत नाहीये.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे समाजातील सर्वच घटकांमध्ये रुजवताना इतर मागासवर्गीय समाजाकडे विशेष लक्ष दिले. त्यातूनच माधव अर्थात माळी, धनगर, वंजारी हा फॉर्मुला विकसित झाला. साहजिकच वंजारी समाजाचे नेतृत्व मुंडे साहेबांकडे आले आणि तीच परंपरा पुढे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे चालवत आहेत. महाराष्ट्रात ओबीसींचं नेतृत्व करणारे अगदी मोजके नेते आहेत, त्यात दोन नाव प्रामुख्याने घेतले जातात, एक म्हणजे छगन भुजबळ आणि दुसरे धनंजय मुंडे.
छगन भुजबळ यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात मनोज जरांगे पाटील आणि अन्य मराठा लॉबीला यश आले. आता राहिले दुसरे नेते, ते आहेत धनंजय मुंडे. मुंडे यांचे कॅरेक्टर Charachter Assassination करायचे अर्थात त्यांना इतके बदनाम करायचे की त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांना घ्यावा लागेल. दुर्दैवाने असे होत नाहीये. आजही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. यातूनच मराठा समाजातील नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठा समाजातील संस्थानिकांचा पक्ष आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडताना ज्या नेत्यांना घेऊन या पक्षाची स्थापना केली, त्यात सर्वाधिक मराठा समाजाचे नेते होते आणि आजही आहेत. हसन मुश्रीफ यांच्यासारखे मुस्लिम किंवा छगन भुजबळ, प्रकाश सोळंके आणि नंतर सहभागी झालेले धनंजय मुंडे सारखे ओबीसी नेते हे अपवाद आहेत. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ किंवा धनंजय मुंडे हे देखील खरंतर संस्थानिक आहेत, ते कुठल्याही पक्षात असले तरी निवडून येतील याची खात्री असल्यानेच पवारांनी त्यांना जवळ केले होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्यानंतर जर कोणाच्या भाषणाला मागणी होती तर ती धनंजय मुंडे यांना होती. त्या काळात धनंजय यांनी अगदी चंद्रपूरपासून तर खाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्हे पिंजून काढले होते. निवडणूक निकालानंतरचा इतिहास तुम्हाला आठवत असेल तर उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होती. ते न पटल्याने अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच तो ऐतिहासिक पहाटेचा शपथविधी केला. हे सर्व कारस्थान धनंजय मुंडे यांनीच रचले आणि धनंजय मुळेच माझा पुतण्या बिघडला, असा शरद पवारांचा समज झाला असावा आणि त्यातूनच त्यांच्या मनात धनंजय बद्दल प्रचंड राग असावा.
आज धनंजय तावडीत सापडला आहे तर मागचा हिशोब चुकता करूया, असा विचार कदाचित पवारांनी केला असावा. म्हणूनच सर्व बाजूंनी धनंजय मुंडे यांची कोंडी केली जात आहे. केवळ सुरेश धसच नव्हे तर पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि भाजपचे आमदार राणा जगजीत सिंग आणि असंख्य मराठा नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यातून त्यांना एकच साध्य करायचे आहे की ओबीसी नेतृत्व संपवायचे आणि मराठा लॉबी पुन्हा एकदा भक्कम करायची.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा दुर्दैवाने घेतला गेलाच तर मराठा समाज ओबीसी समाजाला संपवून टाकेल अशी भीती बहुजन ओबीसी समाजाला वाटते आहे. भुजबळांना आम्ही संपवले, मुंडेलाही संपवले, आता ओबीसी समाजात राहिले कोण? अशी एक दर्पोक्ती या समाजाकडून केली जाण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाने ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या काळातही जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तेव्हा देखील इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही आमच्याच बंधूंना हाताशी धरून राज्यातील वातावरण पेटवण्यात आले आणि त्यातून मराठा आणि ओबीसी समाजात कधी नव्हे ती दरी निर्माण झाली.
ज्या ओबीसी समाजाने मराठा क्रांती मोर्चाचे कौतुक केले होते, त्यांचा आदर्श घ्या, असे म्हटले होते, त्याच समाजाला मराठा समाजाने दूर लोटले. मराठवाड्यात आज शालेय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे, ज्या वयात उत्तम संस्कार व्हायला हवेत, त्या वयात जातीय संस्कार होत आहेत, हे या राज्याचे दुर्दैव आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाली हे दुर्दैवच आहे. त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे. दोशींना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. परंतु गुन्हेगार कधीही जात-पात बघून गुन्हा करत नसतो, याचे भान समाजाने ठेवायला हवे. हत्या झालेली व्यक्ती कोणत्या समाजाची आणि त्याची हत्या करणारा कुठल्या समाजाचा आहे, यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर तो हाणून पाडला पाहिजे.
आणि कोण हे सुरेश धस? धनंजय मुंडेंवर आरोप करणारे धस काय साधू आहेत का? धस राज्यमंत्री असताना मंत्री कार्यालयात लाचलुचपत विभागाने धाड टाकून त्यांच्या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले होते. कदाचित मंत्री कार्यालयात लाचलुचपत विभागाची धाड हे इतिहासातील कदाचित एकमेव उदाहरण असावे. याच धस यांनी धनंजय मुंडे यांची साडेचार तास भेट घेतली. ही भेट काय विचारपूस करण्यासाठी होती का? या भेटीचे वृत्त बाहेर आले नसते तर कदाचित धस यांची भूमिका बदललेली दिसली असती. बिटवीन द लाईन्स अर्थ वाचकांनी काढावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या सरकारने धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या सर्वच आरोपांची, भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावीच, दूध का दूध आणि पाणी का पाणी करावेच, मात्र देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी घेण्याचे मराठा समाजाचे षडयंत्र हाणून पडावे, मीडिया ट्रायलकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे हीच ओबीसी समाजाची मागणी आहे.
देवेंद्र फडणवीस यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपला याच ओबीसी समाजाने भरघोस मतदान करून सत्तेत बसवले आहे. त्यामागे एकच कारण होते की मराठा समाजाकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर अतिक्रमण होऊ नये. मराठा समाजातील काही विशिष्ट समूहाने लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांनाच पाडण्याचा प्रयत्न केला आहे हे निकालावरून सिद्ध झाले आहे. अर्थात सगळ्याच मराठा समाजाचा या कंपूला पाठिंबा होता असे नाही. म्हणूनच आजही मराठा समाजातील एका मोठ्या समूहाने स्वतःला जरांगे पाटील यांच्या आंदोलनापासून आणि राजकीय भूमिकेपासून स्वतःला दूर ठेवले आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष मराठा समाजातील असंख्य लोकांना आजही पटत नाहीये. हेच या राज्यातील जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे.
फडणवीस यांनी देखील केवळ मराठा समाज नाराज होऊ नये म्हणून सुरेश धस यांना अनियंत्रित स्वातंत्र्य देणे थांबवावे. तुमच्या पक्षाचा आमदार तुमचे ऐकत नसेल तर हे तुमच्यातील नेतृत्वाचे अपयश आहे. किमान तुम्ही तरी राजकीय खेळी खेळू नये, अशीच ओबीसी समाजाची अपेक्षा आहे.
(लेखक विवेक भावसार हे राजकारण या मराठी news portal चे संपादक आहेत. त्यांना 9930403073 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
रोहहीदास नरहरी आघाव
February 23, 2025खुपच आभ्यास पुर्ण विष्लेशण आभार. वास्तव हे माध्येमाणीच समाजा पर्यंत पोहचवायला हव आणि ते तुम्ही तुमच्या सपांदक या नात्याचा खुप छान ऊहापोह करुन सत्ये जनमानसा पर्यंत पोहचवण्याचा छानच प्रयन्त केले त्या बद्दल खुप धन्यवाद।