छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (दिल्ली) – संकल्पना, मनुष्यबळ, कौशल्य, तळमळीने कार्य करण्याची वृत्ती, परस्पर सहकार्याची भावना आणि योग्य प्रशिक्षण यांची योग्य सांगड घातली तर राज्याचीच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे लक्ष्य गाठू शकते, असा विश्वास ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केला.
९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात यशवंतराव चव्हाण सभागृहातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व्यासपीठावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात दै. महाराष्ट्र टाइम्सचे समूह संपादक पराग करंदीकर, ‘केपीआयटी’चे प्रमुख रवी पंडित, ‘बीव्हीजी ग्रुप’चे प्रमुख हणमंतराव गायकवाड हे मान्यवर सहभागी झाले होते. पत्रकार व निवेदक प्रसन्न जोशी यांनी संवाद साधला.
साहित्य आणि उद्योगक्षेत्रात मराठीची प्रगती
सेवा, शिक्षण आणि उद्योगक्षेत्रात जेव्हा मराठी माणूस पुढे जातो, तेव्हा त्याची दखल साहित्याच्या माध्यमातून घेतली जाते, असे पराग करंदीकर म्हणाले. सरस्वतीची उपासना करूनही लक्ष्मीला प्रसन्न करता येते, हे मराठी माणसाला गेल्या पाच दशकांत उमगले आहे. व्यवसाय करणे गैर वाटू नये, यासाठी मराठी समाजाची मानसिकता बदलली असून जोखीम (रिस्क) घेण्याची तयारी त्याने दाखवली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मराठीचा डंका केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरही वाजला पाहिजे. भाषा जेव्हा प्रादेशिक बंध ओलांडते, तेव्हाच ती आणि तिची संस्कृती उन्नत होते. जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या बंधनांपलीकडे जाणे आवश्यक आहे, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले.
उद्योगात गुणवत्ता आणि शोधभावनेला प्राधान्य द्या
नुकताच मातृवियोग झालेल्या, मराठी शिक्षिका असलेल्या आपल्या आईला आदरांजली म्हणून दिल्ली साहित्य संमेलनात सहभागी झालेले हणमंतराव गायकवाड यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव मांडले. ते म्हणाले, काम करताना सर्वोच्च गुणवत्ता राखणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही काम लाज न बाळगता आणि सर्वोत्तम पद्धतीने पार पाडले पाहिजे. जगभरात संधी भरपूर आहेत, त्या शोधण्याची गरज आहे. मराठी मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
भारताचा शोध घेणाऱ्या वास्को-द-गामापासून प्रेरणा घेत, नवीन गोष्टी शोधण्याचे धाडस दाखवले पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले.
स्टार्टअप संस्कृती आणि यशाचा मंत्र
स्टार्टअप इकोसिस्टीम आणि स्टार्टअप नेशन या संकल्पनांवर रवी पंडित यांनी सखोल विवेचन केले. भावना, महत्त्वाकांक्षा आणि जिद्द या गोष्टी कोणतेही कार्य करताना महत्त्वाच्या ठरतात. आपली कृती आणि व्यक्तिमत्त्व आपल्या शब्दांपेक्षा अधिक बोलते. जीवनात काहीतरी भव्य-दिव्य करण्याची जिद्द ठेवली पाहिजे.
“आराम हराम आहे,” असे स्पष्ट करत, कष्टाच्या मागे धावले की यश मिळतेच, असा मंत्र त्यांनी दिला.
साहित्य, उद्योग आणि अर्थव्यवस्था यांची योग्य सांगड घालून मराठी समाजाने पुढे जाण्याची गरज आहे. केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा ठसा उमटवणे आवश्यक आहे. योग्य दिशा, मानसिकता आणि मेहनतीने मराठी उद्योजक आणि व्यावसायिक भविष्यातील अर्थव्यवस्थेचा कणा होऊ शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.