परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
मुंबई : परिवहन विभागाच्या नव्या मुख्यालयाचे भूमिपूजन येत्या २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
तत्कालीन मुंबई राज्याच्या परिवहन विभागाची स्थापना १ मार्च १९४० रोजी झाली. त्यामुळे हा दिवस दरवर्षी ‘परिवहन दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच औचित्याने वरळीतील सर पोचखानवाला मार्ग येथे चार मजली भव्य ‘परिवहन भवन’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १२,८०० चौरस मीटर असून, चार मजली भूमिगत पार्किंगमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील. या इमारतीचे काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण होणार आहे.
विशेष म्हणजे, राज्याला दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या परिवहन विभागाला स्वतःचे मुख्यालय नव्हते. विभागाच्या स्थापनेपासून गेली ८५ वर्षे मुख्यालय भाड्याच्या इमारतीत होते. मात्र, परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारताच विभागाच्या पहिल्याच बैठकीत स्वतःच्या इमारतीसाठी संकल्प सोडला आणि सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘परिवहन भवन’च्या भूमिपूजनाचा शुभमुहूर्त येत्या रविवारी ठरला आहे.