मुंबई : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन अवघे तीन महिने झाले आहेत, मात्र महायुतीत धुसफूस गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या फडणवीस सरकार हे या आधीच्या एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाची विविध प्रकारे चौकशी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या आरोग्य विभागातील 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीत सर्व काही आलबेल आहे ना या चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात भाजप- शिवसेना -राष्ट्रवादी काँग्रेस महायुती विजय होऊन जेमतेम तीन महिने उलटले असताना त्यांच्यातील अंतर्गत कलह आता दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या अनेक निर्णयाची चौकशी करण्याचा सपाटा लावला आहे. आरोग्य विभागातील रुपये ३२०० कोटीच्या कामाला त्यांनी स्थगिती दिली आहे. साफसफाईच्या कामाचे कंत्राट अनुभव नसलेल्या एका कंपनीला दिले असल्याने ही स्थगिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी देखील राज्यातील एमएसपी आधारित शेतमाल खरेदी बाबत शिंदे सरकारने घेतलेल्या निर्णयाची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागातील कामांना स्थगिती देऊन त्याच्याही निर्णयाची चौकशी होणार आहे. या स्थगितीवर आता शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आहे, चुकीच्या कामाचं कोणीही समर्थन करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या काळात घोटाळे झालं असं वाटत असेल तर पत्र द्या, आम्ही चौकशीला समोरे जायला तयार आहोत. त्याचबरोबर सरकारमध्ये असताना कोणताही निर्णय घेताना सरकार अडचणीत येईल असं कोणतंही काम आम्ही केलेले नाही असेही ते म्हणाले.