By Supriya Gadiwan
मुंबई : पुण्यातील स्वारगेट आगारात एका बसमध्ये 26 वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आहे. आता या अत्याचार प्रकरणी पुण्यातील महिला जागर समिती आक्रमक झाली असून नराधम आरोपी दत्ता गाडे याची तिरडी हातात घेत अनोखं आंदोलन करत महिला जागर समितीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आक्रमक आंदोलनकर्त्यांनी या आंदोलनातून केली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नाराधम आरोपी दत्तात्रय गाडे याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र गेल्या काही काळापासून शहरात गुन्हेगारी आणि महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मागच्या 40 दिवसात अशा 56 घटना शहरात घडल्या असल्याची माहिती समोर आल्याने नागरिकांकडून आणि महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणात नवनवीन खुलासे आणि दावे करण्यात येत असताना शहरातील संघटनासुद्धा आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज स्वारगेट बस स्थानकात महिला जागर समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात आलं. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने हातात तिरडी घेत आक्रमक होत आंदोलक महिलांकडून जोरदार घोषणा देण्यात आल्या. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीने या आंदोलनात जोर धरला.