By Supriya Gadiwan
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर मुंबईत पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक 3 मार्चपासून सुरू होणार आहे. आता या अधिवेशनात महायुती सरकारला विविध प्रश्नावरून घेरण्यासाठी विरोधी पक्षनेते पदावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या पक्षाच्या आमदारांची मातोश्री येथे काल बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सेनेकडे आल्यास कोणाला जबाबदारी द्यायची याबाबत ठराव मांडला. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांची नावे चर्चेत आहेत. मात्र आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते करावं असे ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही आमदारांचे मत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना आता विरोधी पक्षनेते पदाची संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रूपाने एक तरुण विरोधी पक्षनेता राज्याला मिळू शकतो आणि त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो असे ठाकरेंच्या काही आमदारांचे मत आहे. दुसरीकडे आमदार भास्कर जाधव यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची माळ आदित्य ठाकरेंच्या गळ्यात पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.