By Supriya Gadiwan
मुंबई : केंद्र सरकार संपूर्ण देशभरात सार्वत्रिक पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कोणताही नागरिक या सहभागी होऊन साठ वर्षानंतर पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा उद्देश हा वृद्ध नागरिकांना आर्थिक सुरक्षितता आणि आणि स्थैर्य प्रदान करणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आता दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात येणाऱ्या सार्वत्रिक पेन्शन योजनेत 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. केंद्र सरकारच्या योजनेत राज्य सरकारलाही सामावून घेतले जाणार आहे, जेणेकरून दोन्हीच्या आर्थिक समायोजनाचा लाभ लाभार्थ्याला मिळणार आहे. पेन्शनची रक्कम वाढणार असून लाभार्थ्याच्या संख्येतही वाढ होणार आहे.
या सार्वत्रिक पेन्शन योजनेत प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या योजनांचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार साठ वर्षानंतर दरमहा 3000 रुपयापर्यंत लाभार्थ्यांना पेन्शन मिळणार आहे.
केंद्र सरकारने देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आतापर्यंत विविध योजना सुरू केल्या आहेत. अनेक लाभार्थी या योजनांचे लाभ घेत असून नव्या योजनांचीही यात भर पडत आहे. सार्वजनिक पेन्शन योजना सुरू करण्याच्या तयारीत केंद्र सरकार असून ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या अंतर्गत आणण्याचा विचार सरकार करत आहे. लवकरच संबंधित भागधारकांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.